Nasik News Update : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अगासखिंड येथील जवानास वीरमरण आले आहे. हवालदार खंडू भागुजी बरकले असे या जवानाचे नाव आहे. ते जम्मू काश्मीर येथील लेह येथे कार्यरत होते. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.  


मूळचे सिन्नर येथील मात्र पुण्यात राहणारे बरकले हे गेल्या 30 वर्षांपासून सैन्यदलात कार्यरत आहेत. मागच्याच महिन्यात 9 फेब्रुवारी रोजी 15 दिवसांच्या सुट्टीवर ते आगासखिंड गावी आले होते. सैन्यदलाकडून त्यांना पूणे येथे निवासस्थान देण्यात आले असून तेथे त्यांची पत्नी, बीडीएसला असणारी मुलगी रितू व इंजिनिअर असणारा मुलगा ऋषिकेश हे राहतात. दरम्यान  21 फेब्रुवारी रोजी सुट्टी संपवून ते लेह येथे गेले होते.  दरम्यान 22 फेब्रुवारी रोजी सकाळी डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने सैन्यदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबियांना कळविण्यात आली होती. डोक्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना सैन्यदलाच्या चंदिगड येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे त्यांचे कुटुंबियदेखील पोहचले होते. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यापासून ते कोमातच होते. तेथे उपचार सुरू असतांनाच 7 मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर त्यांचे भाऊ, पत्नी व कुटुंबीय अगासखिंडला परतले. 


सैन्यदलातील सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर उद्या सकाळी सहा वाजता सैन्य दलाचे विमान त्यांचे पार्थिव घेऊन मुंबईला येणार आहेत. मुंबई येथून त्यांचे पार्थिव आगासखिंड येथे आणण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता सुमारास शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


बारावीनंतर सैन्यदलात...


शहीद बरकले हे बारावीनंतर 1991 सैन्य दलात भरती झाले होते. 2002 मध्ये डिफेन्स इन सिक्युरिटी कॅडरमध्ये ते रुजू झाले होते. त्या अंतर्गत त्यांनी श्रीनगर, विशाखापट्टणम, ओझर मिग जबलपूर, केरळ, आसाम येथे सेवा दिली. दोन वर्षांपूर्वी लेह येथील फिल्ड ॲनिमेशन डेपो मध्ये हवालदार म्हणून रुजू झाले होते. तेथेच अद्याप पर्यंत कार्यरत होते. तसेच कोरोना काळात लेह येथे उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल त्यांना दोन पदके देऊन गौरविण्यात आले होते. नुकतेच ते नायब सुभेदार पदाची परीक्षा देखील उत्तीर्ण झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, तीन भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे.


महत्वाच्या बातम्या 


Nashik Rangpanchami : भाव खाऊन जाणारी नाशिकची रंगपंचमी, काय आहे पेशवेकालीन रहाडींचा इतिहास?