Nashik Leopard News : नाशिक शहरासह परिसरात सातत्याने बिबट्याच्या दर्शनासह हल्ल्याच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे नाशिककर धास्तावले असून परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. अशातच सिन्नर तालुक्यातील सोमठाणे भागात सतरा वर्षीय तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. नाशिकमध्ये सातत्याने होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे सामान्य नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे. 


नाशिकच्या आजूबाजूचा परिसरात बिबट्याचा अधिवास असल्याचे वेळोवेळी अधोरेखित होत आहे. अनेकदा बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत असल्याने पिंजरे लावून बिबट्यांना रेस्क्यू केले जात आहे. मात्र तरीदेखील रात्री अपरात्री, दिवसा कधीही बिबट्या नजरेस पडत असल्याने नाशिक शहरातील काही भाग सिन्नर, दारणाचा नदीकाठ, निफाड आदी परिसरात बिबट्याचे दर्शन हमखास होते आहे. याच आठवड्यात नाशिकच्या धोंगडे मळा परिसरात सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास बिबट्याने रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीवर झडप घातली होती. त्यानंतर एका बंगल्यात कुत्र्याची शिकार करण्यासाठी बिबट्या शिरला होता. 


दरम्यान, आज सकाळी सव्वा सहाच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील खंडागळी सोमठाणे भागात पिकांना पाणी देण्यासाठी जात असलेल्या कृष्णा सोमनाथ गीते या तरुणावर बिबट्याने पाठीमागून हल्ला केला. यात डोक्याला, पाठीला, पोटाला गंभीर जखमा झाल्याने सुरवातीला स्थानिक आणि नंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 


पिकांना पाणी देण्यासाठी जात असताना....


सोमठाणे परिसरातील मेंढी भागांत गीते कोकाटे यांची वस्ती असून वडिलांनी पिकांना पाणी देण्याचे सांगितल्याने कृष्णा शेताकडे जात होता. याचवेळी दडी मारून बसलेल्या बिबट्याने कृष्णावर हल्ला चढविला. बिबट्याने डोक्यावर पंजाने हल्ला चढवत कानाचा देखील चावा घेतला. यावेळी कृष्णाने आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. इतर शेतकऱ्यांना पाहताच बिबट्याने दाट झाडीत धूम ठोकली.


कृष्णाचे कुटुंबीय देखील घटनास्थळावर दाखल झाल्यानंतर त्याला तातडीने वडांगळीला प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. मात्र डोक्यावर पोटावर जखमा असल्याने त्याला नाशिक सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यामुळे पुन्हा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे. या आधीही शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी बिबट्याच्या हल्ल्यासंबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. 


ही बातमी वाचा: