Nashik Onion Issue : उन्हाळी कांद्याचे (Onion) भाव आज ना उद्या वाढतील, या आशेने नाशिकच्या (Nashik) कसमादे भागातील शेतकरी महत्प्रयासाने गेल्या चार महिन्यांपासून उन्हाळी कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत आहेत. चाळीतील कांद्याला शेतकऱ्यांनी पलटी मारत पुन्हा कांदा चाळींमध्येच साठविला आहे. सध्या कांद्याला कमी भाव मिळत असल्याने भविष्यात भाव वाढेल, या आशेने कांदा विकायचा की नाही, या संभ्रमावस्थेत शेतकरी आहे.
शेतात राब - राब राबायचं..कष्ट करायचे..अन् महागडे बियाणे खते घेवून कांद्याची लागवड करायची. तीन महिने पोटच्या लेकराप्रमाने रासायनिक खते, औषधे मारून कांदा पीक जतन करायचं. कांदा काढणीला आला की अवकाळी पाऊस (Unseasonal rain), अतिवृष्टी व गारपिटीने झोडपून काढताच डोळ्यादेखत पिकाचे होत्याचे नव्हत करून टाकायचं. निसर्गाच्या या लहरीपणामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याच्या हातात यंदा थोडाफार कांदा हाती लागला. तर त्याला बाजारात योग्य भाव मिळत नाही. केलेला खर्चही फिटत नाही, म्हणून तो कांदा पुन्हा (Onion rate) साठवून ठेवायचा अन् चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा ठेवून चाळीतील कांद्याला जीव लावायचा. अशी सध्या शेतकऱ्याची स्थिती आहे.
सद्यस्थितीत चाळीतील कांदा सडू लागला आहे. त्यामुळे चाळीतील कांदा बाहेर काढून त्यावर प्रक्रिया करत तसेच त्यातील सडलेला कांदा बाहेर काढून पुन्हा चाळ भरण्याचे काम कांदा उत्पादक शेतकरी वर्गाकडून केले जात आहे. हे सगळं करतांना कांदे निवडायचे अन् पुन्हा भरायचे. यासाठी मोठी मेहनत अन् मजुरी देखील मोजावी लागत आहे. मात्र या सर्व प्रक्रियेत कांद्याची प्रतवारी घसरून वजन देखील दिवसेंदिवस घटत आहे. आज चांगल्या प्रतावरीचा कांदा बाजारात विक्रीसाठी घेवून गेल्यास त्याला योग्य भाव मिळतं नाही अन् चाळीतच ठेवला तर तो सडू लागला आहे. सडलेला कांदा उकिरड्यावर फेकावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संभ्रमावस्थेत आहे..
कांद्याविषयी धोरण नेमक काय?
कांदा हे कसमादे भागातील प्रमुख नगदी पीक आहे. मागील वर्षीही उन्हाळ कांद्याला विशेष भाव मिळाला नव्हता. या वर्षी ब-याच भागातील कांदा अवकाळी पावसामुळे खराब झाल्याने शिल्लक कांद्याला भाव मिळेल, असा शेतक-यांचा अंदाज होता. मध्यंतरी कांद्याचे भाव थोडेसे वाढले पण मात्र भाव पुन्हा कमी झाल्याने शेतक-यांची कांदा विक्रीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कांदा आता विकावा की नंतर, अशी द्विधा मन:स्थिती शेतक-यांची झाली आहे..या सर्व परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकार यांचे कांद्याविषयी धोरण नेमक काय? कांद्याला हमीभाव कधी देणार? एकतर 350 रू जाहीर केलेले अनुदान देखील अजून खात्यात मिळत नाही. खरिपाची पेरणी झाली पण पाऊस मात्र रुसल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यां समोर उभे ठाकले आहे. अशा शेतकऱ्यांनी करायचं तरी काय? असा सवाल आता शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. एकूणच, कांदा चाळीत साठवून ठेवला तर तो खराब होतो..अन् विकायला काढला तर तुटपुंजा भाव कांद्याला मिळतो, अशी अवस्था असल्याने जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा सध्या संभ्रमावस्थेत सापडला आहे..
इतर महत्वाच्या बातम्या :
Onion News : चाळीत ठेवलेला कांदा लागला सडू, बदलत्या हवामानाचा फटका; शेतकरी दरवाढीच्या प्रतिक्षेत