Sukh Mhanje Nakki Kay Asta:  गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील (Mumbai) गोरेगाव (Goregaon) येथील फिल्मसिटीमध्ये बिबट्या दिसल्याची घटना घडत आहे. काही दिवसांपूर्वी 'अजूनी'  या मालिकेच्या सेटवर बिबट्या दिसला होता. आता  "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या दिसला आहे. बुधवारी (26 जुलै) एक बिबट्या त्याच्या पिल्लासह  "सुख म्हणजे नक्की काय असतं" मालिकेच्या सेटवर फिरताना दिसला. एएनआय या वृत्तसंस्थेच्या ट्विटर अकाऊंटवर या बिबट्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 


ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी एएनआय वृत्तसंस्थेला माहिती दिली की, 'बुधवारी बिबट्याने स्टुडिओमध्ये प्रवेश केला तेव्हा सेटवर 200 हून अधिक लोक उपस्थित होते.'


"सेटवर 200 हून अधिक लोक उपस्थित होते, एखाद्याला जीव गमवावा लागला असता. गेल्या 10 दिवसांत अशी ही तिसरी किंवा चौथी घटना आहे. सरकार यावर ठोस उपाययोजना करत नाही," असंही गुप्ता यांनी सांगितलं. व्हिडीओमध्ये एक बिबट्या सेटच्या आवारात फिरताना दिसत आहे आणि  बिबट्या पाहून घाबरलेले लोक सुरक्षिततेसाठी धावत असल्याचे देखील व्हिडीओमध्ये दिसत आहे. 


पाहा व्हिडीओ:






18 जुलै रोजी देखील अशीच एक घटना घडली होती. 'अजूनी' या मालिकेच्या सेटवर बिबट्या दिसला होता. बिबट्याने सेटवरील एका कुत्र्यावर हल्ला केला होता. 'अजूनी' सेटवर दिसलेल्या बिबट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.






फिल्मसिटीमध्ये अनेक  मालिका आणि चित्रपटांचे शूटिंग होत असते. फिल्मसिटीच्या परिसरात  बिबट्यांचा सतत वावर असल्याने शूटिंगसाठी येणारे कलाकार आणि युनिट कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


हेही वाचा-


Sagar Talashikar: अभिनेते सागर तळाशीकर तब्बल पाच तास अडकले पुण्याच्या वाहतूक कोंडीत; व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “भयंकर आहे हे”