(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News Update : एकाच दिवशी तीन बिबटे जेरबंद, नाशिक जिल्ह्यात अनेक भागात दहशत
Nashik News Update : नाशिक जिल्ह्यातील बिबट्याच्या दर्शनासह हल्ले सुरूच असून काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे गावानजीक बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
Nashik News Update : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यात एकाच दिवशी तीन बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या तीनही ठिकाणी बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिक दहशतीखाली वावरत होते. तर काही भागात अजूनही मादी तसेच बछड्यांचा वावर असल्याने शेतकरी नागरिकांमध्ये भीती कायम आहे.
नाशिक जिल्ह्यातील बिबट्याच्या दर्शनासह हल्ले सुरूच असून काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे गावानजीक बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर वनविभागाने संबंधित परिसरात पिंजरे लावण्यासह सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. अखेर घटनेच्या दहा दिवसांनंतर परिसरातून बिबट्या जेरबंद झाला आहे.
सिन्नर तालुक्यातील फुलेनगर माळवाडी शिवारात नर बिबट्याला जेल बंद करण्यात वन विभागाला यश मिळाले. या परिसरात अद्याप मादीसह दोन बछड्यांचा मुक्त संचार सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत कायम आहे. दोन दिवसांपूर्वीच बिबट्याने खंडेराव नारायण पठाडे यांच्या पाळीव कुत्र्याला भक्ष्य केल्याने वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार पठाडे यांच्या गट नंबर 378 मध्ये रविवारी सायंकाळी सहा वाजता वन विभागाने पिंजरा लावून त्यात कोंबड्या सोडल्या होत्या. त्यानंतर रात्री साडेबारा वाजता बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. बिबट्याच्या डरकाळीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे येथे दहा दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एक निरागस बालकाला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली होती. अखेर या बालकाच्या दशक्रिया विधीच्या दिवशी बिबट्या पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. बिबट्याच्या हल्ल्यानंतर वन विभागाने परिसरात पिंजरे लावून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.
इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारातील कपालेश्वर महादेव येथे डोंगराजवळ सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांना आजारी असलेल्या बिबट्याचे दर्शन घडले होते. त्याची खबर तात्काळ वन विभागाला कळविण्यात आल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला जाळ्यात अडकवत जेरबंद केले. दरम्यान हा बिबट्या आठ ते नऊ वर्षाचा असून तो आजारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर नाशिक येथे उपचार सुरू करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या