Nashik News : एका ओढ्याच्या पाण्यात तरुणांच्या दोन गटात तुंबळ हाणामारीचा (Fight Between Two Groups) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये (Social Media) व्हायरल होत आहे. दरम्यान याबाबत अधिक तपास केला असता हा व्हिडीओ नाशिकमधला आहे. नाशिकच्या घोटी त्र्यंबकेश्वर मार्गावरील पहिने (Pahine) या प्रसिद्ध पर्यटनस्थळावर शनिवारी 16 जुलै रोजी संध्याकाळी साडेचार वाजता ही घटना घडली होती. 


वन विभागाने बंदी घातलेली असताना देखील पावसाचा आनंद लुटण्यासाठी शनिवारी पहिनेत पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. मात्र याचवेळी नेकलेस धबधब्यासमोर (Necklace Waterfall) साचलेल्या तळ्यात अंगावर पाणी उडाल्याच्या किरकोळ कारणावरुन दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड गावचे तीन तरुण आणि नाशिकच्या सातपूरमधील पाच तरुणांमध्ये वाद झाला आणि काही वेळाने या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. 


दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल होताच वाडीवऱ्हे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या आठही जणांना शनिवारी रात्रीच ताब्यात घेत त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी हाणामारी केली, दंगा माजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पहीने हे ठिकाण हाणामारीच्या घटना, तरुण-तरुणींची हुल्लडबाजी यामुळे अधिक चर्चेत येत असून यावर आळा बसवण्यासाठी वन विभाग आणि पोलिस प्रशासनाने फक्त कागदापुरती आदेश न काढता कठोर कारवाया करणं गरजेचं बनलं आहे.


हुल्लडबाजीला 'ब्रेक', नाशिकच्या पर्यटन स्थळांवर 'नो एंट्री'
एकीकडे नाशिक शहरासह जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पाऊसाने जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्याला बहर आला आहे. मात्र दुसरीकडे दरवर्षीप्रमाणे पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी करणारे देखील वाढत चालले आहेत. यामुळे पर्यटनाला येणाऱ्या इतर पर्यटकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच साल्हेरची घटनेमुळे नाशिक वनविभाग आणि पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात मुख्य पर्यटनस्थळांवर बंदी घातली आहे. 


साल्हेर किल्ल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू
हौशी पर्यटक वर्षा सहलीच्या नावाखाली गडकिल्ल्यांच्या धोकादायक ठिकाणी पर्यटनासाठी जातात. यामुळे दुर्घटना वाढत असून साल्हेर किल्ल्यावरुन (Salher Fort) पडून तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर जिल्ह्यातील सर्वच गडकिल्ल्यांसह धबधबे आणि धोकादायक ठिकाणी पर्यटनासाठी फिरकूच नका असे निर्देश पोलीस आणि वन विभागाने नागरिकांना दिले आहेत. 


संबंधित बातम्या


Viral Video : नाशिकमध्ये पर्यटनस्थळांवर दोन गटात हाणामारी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल


Nashik News : हुल्लडबाजीला 'ब्रेक', नाशिकच्या पर्यटन स्थळांवर 'नो एंट्री', अन्यथा कारवाई