Nashik Fight Viral Video : नाशिक (Nashik News) शहरापासून जवळच असलेल्या पहिने परिसर दरवर्षी पावसाळ्यात गर्दीने फुलून जातो. येथील निसर्ग सौंदर्य, नेकलेस धबधबा नेहमीच पर्यटकांना आकर्षण ठरला आहे. मात्र मागील काही वर्षात हे ठिकाण सोशल मीडियामुळे (Socia Media) अधिकच चर्चेत आले आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूपच वाढली आहे. यामुळेच येथील स्थानिकांना रोजगार साधन उपलब्ध झाले. मात्र या सर्वांत हुल्लडबाजी देखील वाढली आहे. मद्यसेवन करून धिंगाणा घालणाऱ्या तरुण तरुणींची संख्याही वाढली आहे. परिणामी हाणामारी, मुलींची छेड हे प्रकार नित्याचे झाले असून आता देखील दोन गटांत तुंबळ हाणामारीचा व्हिडीओ समोर आला आहे. 


पहिने येथील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून यामध्ये दोन गट ओढ्याच्या पाण्यात मारहाण करीत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी असाच हुल्लडबाजीचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओतही काही तरुण रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकला अडवून हॉर्नच्या आवाजावर नाचत असल्याचे समोर आले होते. 


पोलिसांकडून कारवाई


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर प्रशासनाने संबंधित हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना शोधून काढले असून त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र अशा पद्धतीने वाढत असलेल्या हुल्लडबाजीला आळा बसणार कधी? हा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे. प्रशासनाने वेळोवेळी सूचना देऊनही अशा प्रकारे पर्यटकांकडून वर्तन करण्यात येत असल्याने इतर पर्यटकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.


हे ही वाचा -