Nashik : धक्कादायक! नाशिकमध्ये बिबट्याच्या कातडीच्या तस्करीचा डाव उधळला, कॉलेजच्या तरुणांचा सहभाग
बिबट्या आणि वन्य प्राण्यांची तस्करी करणारे आरोपी हे महाविद्यालयातील विद्यार्थी असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.
Nashik Crime : नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याच्या कातडीसह इतर वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीचा डाव वनपथकाने हाणून पाडला आहे. गेल्या पंधरा दिवसांत ही तिसरी कारवाई असल्याने नाशिक वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीचे केंद्र बनत चालल्याचे चित्र आहे.
काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर जवळील अंबोली फाट्यानजीक मोठ्या शिताफीने बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्यांना पकडण्यात आले होते. त्यानंतर बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या स्लीपर सेल्सना न्यायालयात हजर केले असता त्यांना सशर्त जामीन मंजूर केला होता. एवढी मोठी कारवाई झाल्यानंतर पाच दिवसांपूर्वी दिंडोरी परिसरात बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या स्लीपर सेल्सना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा नाशिकच्या उच्चभ्रू परिसरात तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या विशेष वनपथकाने वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी पुन्हा एकदा उधळली. वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून संशयिताशी संपर्क साधला. आज सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास सापळा नाशिक शहरातील इंदिरा नगर परिसरातील कृषी नगर जॉगिंग ट्रॅक जवळ ही कारवाई करण्यात आली. यावेळी तीन संशयित तरुणांना वन्यजीवांच्या अवयवांची विक्री करताना रंगेहाथ पकडले आहे.
महाविद्यालयिन विद्यार्थी..
संशयित आरोपींमध्ये तिन्ही महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे प्रथमदर्शनी तपासात पुढे आले आहे. संशयितांच्या सोबत आणखी काही साथीदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. सदर कारवाईत एक बिबट वन प्राण्याची कातडी, चिकाराची दोन शिंगे, निलगाईचे दोन शिंगे तसेच चार मोबाईल असा मुद्देमाल संशयितांकडून ताब्यात घेतला आहे. पुढील चौकशीसाठी तिघांनाही ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
स्लीपर सेलचे नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या आदिवासी भाग आणि वनपट्टे असलेल्या परिसरात वन्यजीवांची हत्या करून अवयवांची विक्री करण्यात येत घटना सातत्याने समोर आहेत. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, मोखाडा, पेठ आदी परिसरातील नागरिकचं यात सक्रिय असल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे. जंगलव्याप्त परिसर आल्याने वनप्राण्यांचं वास्तव्य आहे. याचा फायदा घेऊन वनक्षेत्रातील मृत, अशक्त बिबट्या अथवा एखाद्या प्राण्याला मारून त्याची कातडी व इतर अवयव विकण्यासाठी 'स्लीपर सेल' कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.