नाशिकच्या कार जळीत दुर्घटनेतील संजय शिंदे मी नव्हे... मी सुखरुप : आ. संजयमामा शिंदे
नाशिकमध्ये गाडीला लागलेल्या आगीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय शिंदे यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र अनेक वृत्तवाहिन्या आणि वेबसाईट्सनी बातमी प्रसारित करताना करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचा फोटो वापरला. यावर दुर्घटनेतील संजय शिंदे आपण नसल्याचं संजयमामा शिंदे यांनी सांगितलं.
![नाशिकच्या कार जळीत दुर्घटनेतील संजय शिंदे मी नव्हे... मी सुखरुप : आ. संजयमामा शिंदे I am not Sanjay Shinde who was involved in a car burning accident in Nashik, clarifies Sanjaymama Shinde नाशिकच्या कार जळीत दुर्घटनेतील संजय शिंदे मी नव्हे... मी सुखरुप : आ. संजयमामा शिंदे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/15190740/Sanjaymama-Shinde.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : नाशिकमध्ये गाडीला लागलेल्या आगीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय शिंदे यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र अनेक वृत्तवाहिन्या आणि वेबसाईट्सनी बातमी प्रसारित करताना करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचा फोटो वापरला. मी सुखरुप असून नजरचुकीने बातमीत माझा फोटो वापरल्याची प्रतिक्रिया संजय मामा शिंदे यांनी दिली. त्यांनी या संदर्भात फेसबुकवर पोस्ट केली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत टोल प्लाझाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय शिंदे यांच्या गाडीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत त्यांचा होरपळून मृत्यू झाला. संजय शिंदे हे नाशिकमधील द्राक्षांचे व्यापारी आहेत. द्राक्षांच्या बागेसाठी कीटकनाशके आणण्यासाठी ते पिंपळगावला निघाले होते. कडवा नदीवरील ओव्हरब्रिजजवळ असताना त्यांच्या गाडीत बिघाड झाला. शॉर्ट सर्किट झाल्याने गाडीला आग लागली. कारमध्ये असलेल्या सॅनिटायझरमुळे आग आणखीच भडकली. शिवाय कारचा सेंट्रल लॉक लागल्याने त्यांना बाहेर पडता आलं नाही आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला.
राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांच्या गाडीला आग; आगीत होरपळून मृत्यू
परंतु या बातमीचं वार्तांकन करताना अनेक वृत्तवाहिन्या आणि वेबसाईटनी नाव आणि पक्ष साधर्म्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या संजय शिंदे यांच्या जागी आमदार संजयमामा शिंदे यांचा फोटो वापरला. त्यामुळे संजयमामा शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालं. अखेर संजयमामा शिंदे यांनी फेसबुकवर या संदर्भात पोस्ट लिहून आपण सुरक्षित असल्याचं सांगितलं आणि गैरसमज दूर केला.
संजय मामा शिंदे यांनी लिहिलं आहे की, "सदर बातमी मध्ये माझा फोटो नजर चुकीने वापरला आहे.ही बातमी नाशिक मधील आहे. मी सुखरूप घरी आहे."
सदर बातमी मध्ये माझा फोटो नजर चुकीने वापरला आहे.ही बातमी नाशिक मधील आहे.मी सुखरूप घरी आहे.
Posted by Sanjaymama Shinde - संजयमामा शिंदे on Wednesday, 14 October 2020
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)