नाशिक : सध्या राज्यावर अतिवृष्टीचं संकट कोसळलं आहे. अनेक भागांत पूरस्थिती उद्भवली आहे, तर काही भागांत दरडी कोसळल्यामुळे कित्येक मृत्यमुखी पडले आहेत. काहीजण बेपत्ता आहेत. त्या-त्या जिल्ह्यातील मंत्र्याशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. 


अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बोलताना सांगितलं की, "पावसाचा जोर कमी होत आहे. मदतीला वेगही येतोय. पण पुरामुळे लोकांची घरदारं गेली, अन्नधान्य खराब झाली आहेत. लोक निराधार झाली आहेत. या लोकांना ताबडतोब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, 5 केरोसीनचा जार दिला जाणार आहे. ज्यांना गहू नको त्यांना तांदूळ देण्यात येणार आहे. 5 किलो डाळ ही दिली जाणार आहे. याबाबत मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यांशी बोलून निर्णय घेतला आहे."


शिवभोजन थाळीचे दुप्पट वाटप करणार आहे. अनेक ठिकाणी शिवभोजन केंद्र नेस्तनाबूत झाली आहेत. त्यांनी बाजूच्या तालुक्यातील केंद्रवरून शिवभोजन घ्यावे. 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, 5 लिटर केरोसीन, 5 किलो डाळ, दुप्पट शिवभोजन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचंही अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. तसेच पूरस्थितीमुळे गिरण्यांमध्ये पाणी गेलं आहे. त्यामुळे गहू दळणं कठिण असेल, तर अशा लोकांवा तांदूळ देणार, तसेच जोपर्यंत पूरस्थिती सुरळीत होत नाही, तोपर्यंत अन्नधान्याचा पुरवठा करणार असून कमी पडू देणार नाही, अशी माहितीही छगन भुजबळ यांनी दिली. 


कोणत्याही नियमांचा किस न पाडता सरसकट सर्वांना मदत करणार आहे. तसेच विदर्भातील अधिकाऱ्यांनीही पूरग्रस्त भागात मदत करावी, असंही छगन भुजबळ म्हणाले. सुधारित आदेश ताबोडतोब मिळतील, आदेश येईपर्यंत अधिकाऱ्यांनीही थांबू नये मदतकार्य सुरु करावे, असंही ते म्हणाले. 


"सध्याच्या परिस्थितीत हजार दोन हजार लोक एकत्र येऊ शकत नाही, तुर्तास संमेलनाला राज्य सरकार परवानगी देईल, असं वाटत नाही. साहित्य महामंडळाला काही मदत लागल्यास जरूर करणार परंतु, तुर्तास संमेलन होणे शक्य नाही. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात होणारे मोर्चे, आंदोलनही थांबवली आहेत. त्यामुळे साहित्य संमेलनाला गर्दी करणे योग्य नाही.", असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :