मुंबई : मुसळधार पावसामुळे कोकणासह सांगली, सातारा आणि कोल्हापुरातील परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे. अनेक घटनांमधून मृतांचे आकडे वाढताना पाहायला मिळतात. हवामान खात्याचा अलर्ट असतानाही मदत यंत्रणा सज्ज का नव्हत्या? असा प्रश्न आता समोर येतोय. त्यामुळे यंत्रणेच्या हालगर्जीपणाचे हे बळी आहेत का? असा प्रश्नही आता उपस्थित करण्यात येत आहे. 


गेल्या आठवडाभरापासून कोकणासह राज्यात धुवाधार पाऊस पडतोय. त्यात बुधवारी रात्रीपासून कोकणात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला. समुद्राला आलेली भरती आणि धरणांमधून पाण्याचा होणार विसर्ग यामुळे कोकणातील अनेक भागात बिकट अवस्था झाली. एवढी मोठी गंभीर परिस्थिती होत असताना, प्रशासनाने डोळे उघडे ठेवून जागरुक राहणं महत्वाचं होतं. मात्र प्रशासनाला कुठेतरी झोप लागली आणि कोकणासह इतर जिल्ह्यामध्ये हाहाकार माजला.


चिपळूणमध्ये धुवाधार पाऊस पडत होता. अनेक रस्ते रात्रीत पाण्याखाली गेले होते. अनेक घरं पाण्यात बुडाली होती. मेटाकुटीला येऊन आपला जीव वाचवण्याचा अनेकजण प्रयत्न करत होते. त्यात सकाळी 8 वाजता प्रशासन जाग झालं. आणि गुरुवारी सकाळी 8 वाजता मंत्रालयातील आपत्कालीन व्यवस्थापनाला मदत मागितली. त्यानंतर साडेआठ वाजता एनडीआरएफची टीम कोकणाच्या दिशेने निघाली. मात्र सावित्री नदीला आलेला पूर लक्षात घेता ही टीम रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पोहोचू शकली नाही. अशावेळी हेलिकॉप्टरची गरज मोठ्या प्रमाणावर होती. मात्र हेलिकॉप्टरची मागणी गुरुवारी दुपारनंतर करण्यात आली. त्यामुळे हेलिकॉप्टर काळोख होत असताना घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे काळोखात कोणतीच मदत होऊ शकली नाही. एवढी मोठी घटना घडल्यानंतर ही इतर राज्यातील टीमला शुक्रवारी उशिरा पाचारण करण्यात आलं. त्यामुळे कुठेतरी प्रशासनासोबत राज्यकर्त्यांचा ही हलगर्जीपणा यातून स्पष्ट होत आहे. कोकणातील परिस्थिती ही राज्यासाठी काही नवीन नाही. या आधीसुद्धा माळीणसारख्या अनेक दुर्दैवी घटना राज्यात घडल्या आहेत.


राज्याच्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी काय यंत्रणा राज्यात तयार आहेत?


एनडीआआरएफ



  • राज्यात एकूण एनडीआरएफच्या 18 टीम आहेत

  • त्यातील पुण्यामध्ये 15 टीम असतात तर मुंबईमध्ये ३ टीम तैनात असतात

  • एका टीम मध्ये 45 जवानांची संख्या असते

  • घटना घडताच या टीम या ठिकाणाहून रवाना होतात


एसडीआरएफ



  • एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यात एसडीआरएफची स्थापना झाली

  • एसडीआरएफचे मुख्यालय नागपूर आणि धुळे या ठिकाणी आहे

  • धुळे या मुख्यालयात तीन टीम आहेत तर नागपूर मुख्यालयात तीन टीम आहेत एकूण सहा टीम मध्ये 428 जवान कार्यरत आहेत

  • एनडीआरएफ मुख्यालय मुंबई आणि पुण्यात असल्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात काही घटना घडल्यास त्या ठिकाणी लवकर पोहोचण्यासाठी एसडीआरएफची मुख्यालय या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत

  • या दोनही दलांच्या सोबत कोस्ट गार्ड सुद्धा कार्यरत आहेत. त्यामुळे राज्यात कुठेही घटना घडली तर या टीम पोहोचण्यासाठी कार्यरत असतात. याही पेक्षा अधिक गरज वाटल्यास आर्मी आणि नेव्हीला पाचारण केलं जातं.


सध्या राज्याच्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणी किती टीम तैनात आहेत.



  • रत्नागिरी


4 एनडीआरएफच्या टीम
2 कोस्ट गार्ड टीम
2 इंडियन नेव्ही टीम
2 आर्मी टीम पोहचत आहेत



  • रायगड


2 एनडीआरएफ त्यातील एक हवाई मार्गाने पोहचत आहेत
2 एसडीआरएफ (धुळ मुख्यलयातील)



  • सिंधुदुर्ग


1 एनडीआरएफ



  • सांगली


१ एनडीआरएफ



  • सातारा


1 एनडीआरएफ



  • कोल्हापूर


2 एनडीआरएफ



  • नागपूर


2 एसडीआरएफ



  • पालघर


1 एनडीआरएफ



  • ठाणे


2 एनडीआरएफ


भुवनेश्वर वरून आणखी 8 एनडीआरएफच्या टीमची कुमक मागवण्यात आली आहे.


दरम्यान, अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये तैनात असलेली कुमक पुरेशी आहे का? याचा विचार करण्याची वेळ तर आलीच आहे. परंतु अशी घटना घडल्यानंतर मीडियाचे कॅमेरे घटनास्थळी पोहोचतात, विरोधी पक्ष नेते घटनास्थळी पोहोचतात. मात्र मदत यंत्रणा पोहोचत नसतील, तर याला जबाबदार कोण? याच ही उत्तर शोधण्याची गरज आता सरकारला आली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :