सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर आला त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. तिलारी नदीपात्रातील पाण्याची पातळी सद्यस्थितीत 43.60 मीटर ( धोका पातळी) इतकी आहे. पुढील चोवीस तासात मुसळधार पर्जन्यवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. संभाव्य अतिवृष्टीमुळे सांडव्यावरून होणाऱ्या विसर्गामध्ये वाढ होऊन नदीतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. तिलारी नदीकाठच्या गावातील सर्व ग्रामस्थ, शेतकरी यांनी पुढील 5 दिवस सतर्क राहून सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 
तिलारी आंतरराज्य  पाटबंधारे प्रकल्पांतर्गत तिलारी नदीवर मुख्य धरण हे कोनाळ गावाजवळ आहे. तिलारी नदी धरणापासून 21 कि.मी. लांबीचा प्रवास करून गोवा राज्यात प्रवेश करते. तिलारी धरणाची पाणी पातळी 111.70 मीटर (94.80 टक्के ) भरले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे येणारा विसर्ग थेट नदी प्रवाहात वर्ग होत आहे. सद्यःस्थितीत सांडव्यावरून 1123 घ.मी. / सेकंद या प्रमाणे विसर्ग सुरू असून संकल्पीत पूर विसर्ग 3233 घ.मी./सेकंद इतका आहे. 


कणकवली तालुक्यातील दिगवळे रांजणवाडी येथिल घाडे यांच्या घरावर दरड कोसळल्याने त्या घरातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. यामध्ये  एक पुरुष जखमी देखील झाल्याची  घटना समोर आली आहे. या घरातील इतर दोघे सुदैवाने बचावले असून जखमीवर नाटळ येथे उपचार सुरू आहेत. प्रांताधिकारी वैशाली राजमाने, महसूल विभागाचे तहसीलदार रमेश पवार, महसूल कर्मचारी, तसेच जि. प. माजी अध्यक्ष संदेश सावंत, कणकवली शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत,  आनंद आचरेकर, ग्रामस्थ आदींनी धाव घेतली. यामुळे त्यांच्या घराचे नुकसान झाले असून घरावरील दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केलं.


कणकवली तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. कलमठ लांजेवाडी येथे वटवृक्ष कोसळल्याने विज खांब  उन्मळून पडले. यामुळे या ठिकाणचा विद्यतु पुरवठा खंडित झाला. तसेच काही काळ अवजड वाहतूक देखील बंद होती. कणकवली महामार्गाला लागून असलेल्या तरंदळे मार्गावर कलमठ-गावडेवाडी येथील ओहाळावरील पूलावर पाणी आल्याने पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे सायंकाळी उशीरापर्यंत आजुबाजूच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली हाेती. पाण्याचा झोत मोठा असल्याने कामानिमित्त कणकवलीला आलेल्या नागरिकांना पाणी ओसरेपर्यंत थांबून राहावे लागले. ओहाळाच्या बाजुला असलेले कलमठ-गावडेवाडी येथील श्री गायत्री ब्राम्हणदेव मंदीर पुराच्या पाण्यात दिसेनासे झाले होते. तरंदळे रस्त्यावरुन दिवसा वाहनांची व नागरीकांची मोठी वर्दळ असते. कारण तरंदळे, माईण, भरणी, कुवळे, आयनल, चाफेड, साळशी, शिरगांवकडे जाणारी वाहने याच मार्गावरुन ये जा करत असतात. मात्र गुरुवारी पाऊस जोरदार बरसू लागल्याने वाहनांची वर्दळही कमी झाली होती. नागरिकांची शेतीही पाण्याखाली गेल्याने खुप मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास अजून काही ठिकाणे पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. खारेपाटण येथील शुकनदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून खबरदरीचा उपाय म्हणून खारेपाटण मुबई - गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल अवजड तसेच सर्वच वाहनांच्या वाहतुकीसाठी सद्ध्या बंद करण्यात आला आहे. यामुळे मुंबई - गोवा महामार्गावर खारेपाटण येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 


तेरेखोल नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाढच्या गावात पाणी शिरलंय. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. ओटवणे येथील रवळनाथ मंदिराच्या पायरीपर्यंत पाण्याची पातळी पोहोचली. काही ठिकाणी घराच्या भींती कोसळल्या. तर पोल्ट्री व्यावसायिकांच्या कोंबड्याही वाहून गेल्या. तर शेतीही पाण्याखाली गेल्याने कुजून जाण्याची शक्यता आहे. एकंदर या मुसळधार पावसाचा फटका सर्वसामान्य जनता, व्यावसायिक, शेतकरी अशा सर्वांनाच बसल्याचं चित्र समोर येतंय.


कोल्हापूर आणि तळकोकणाला जोडणारा भुईबावडा घाटरस्ता घाटात मधोमध दुभंगला असून या रस्त्यातून अवजडसह सर्वच वाहनांची वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे. करूळ घाटरस्ता दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे 26 जुलैपर्यंत करूळ घाटातील सर्व वाहतूक याआधीच बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गगनबावड्यातून वैभववाडी अथवा खारेपाटणच्या दिशेने जाणारा जवळचा मार्ग म्हणून भुईबावडा घाटरस्त्याचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाहनचालकांकडून होत आहे. त्यातच पिडब्ल्यूडी खात्यानेही कणकवली प्रांताधिकाऱ्यांना भुईबावडा घाटरस्ता धोकादायक असून अवजड वाहतूक बंद करण्याची विनंती केली होती. दरम्यान भुईबावडा घाटात रस्ता मधोमध दुभंगला असल्यामुळे यामार्गे वाहतूक करणे म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. वैभववाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी एपीआय अतुल जाधव यांना घाटरस्ता दुभंगल्याची माहिती मिळताच तात्काळ एपीआय जाधव यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसह भुईबावडा घाटात धाव घेतली. रस्ता दुभंगला असल्यामुळे कधीही जीवघेणा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. रस्ता दुभंगल्याची पाहणी केल्यानंतर संभाव्य अपघात टाळण्यासाठी एपीआय जाधव यांनी तात्काळ बॅरिकेट्स लावत भुईबावडा घाटमार्गे होणारी सगळी वाहतूक बंद केली आहे. नागरिक आणि वाहनचालकांनी भुईबावडा घाट सर्व वाहतुकीसाठी बंद असल्याची नोंद घेत पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही एपीआय अतुल जाधव यांनी केले आहे.


तेरेखोल येथेही अतिवृष्टीमुळे नदीला पूर आला आणि नदीचे पाणी शेर्ले गावात शिरले. त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर तरेखोल नदीतील तब्बल आठ ते नऊ फुटी मगरही शेर्ले परिसरात वाहत आली. ग्रामस्थांच्या ती नजरेस पडताच अनेकांची भीतीने धांदल उडाली. अखेर ग्रामस्थांनी प्रयत्नामुळे मगरीला जेरबंद करणे शक्य झाले. मगरीला पकडून बांदा बाजारपेठेतील वनविभाग कार्यालयाकडे तिला सुपूर्द करण्यात आले. दरम्यान, मगरीला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. परिसरात अनेक ठिकाणी अजूनही पुराचे पाणी कायम असल्याने त्या ठिकाणीही प्रवाहासोबत आलेल्या मगरी असण्याची शंका ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
वैभववाडी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हेत मौदे मार्गावर अनेक ठिकाणी दरडी पडल्याचा प्रकार घडला. त्यामुळे सदर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. भोम, मौदे, आखवणे गुरववाडीचा संपर्क तुटला होता. हेत मौदे मूळ रस्ता अरुणा धरण प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेल्यामुळे पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. 


मालवण तालुक्यातील मसुरे, बांदिवडे गावात पूर परिस्थिती निर्माण झाली. मसुरे कावावाडी, टोकळवाडी सह बांदिवडे, चिंदर, तेरई तसेच खोत जुवा, मसुरकर जुवा, सय्यद जुवा, हडी पाणखोल जुवा या भागात ग्रामस्थांच्या अंगणात पुराच्या पाण्याने प्रवेश केला होता. मसुरेतील रमाई नदीची पाण्याची पातळी कमी असल्याने मसदे मार्ग चालू होता. तर कांदळगाव व मागवणे मार्ग पाण्याखाली गेला होता. तीन दिवसांच्या फरकाने पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याच्या  भीतीने येथील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन रात्रभर जागता पहारा  द्यावा लागला. गडनदीचे पाणी विरुद्ध दिशेने रमाई नदी सह त्रिंबक नदी मधून वस्तीत घुसले आहे. पाऊस थांबला असला तरी पाण्याची पातळी वाढत असल्याने ग्रामस्थांनी सतर्क राहणे आवश्यक बनले आहे. गेले पंधरा दिवस मसुरे पंचक्रोशीतील भातशेती पूर्णपणे पाण्याखाली असल्याने भातशेती कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे.
 
दोडामार्ग तालुक्यातील खोक्रल येथे पुराच्या प्रवाहात सापडून सुनीता शांताराम गवस (वय 65) ही महिला वाहून गेल्याने मृत्यू झाला. आपल्या काजू बागायतीत गेल्या होत्या. उशिरापर्यंत त्या घरी न परतल्याने सरपंच ग्रामस्थांनी तिची परिसरात शोधाशोध सुरु केली. पुराचा प्रवाह मोठा असल्याने त्या पुरात वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानंतर नदीपात्रात शोधाशोध केली असता त्यांचा मृतदेह आढळून आला. 


कुडाळ तालुक्यातील कर्ली नदीने पुररेषा ओलांडून नदीचं पाणी नदीच्या पात्राबाहेरील गावामध्ये पाणी गेल्याने कर्ली नदीकाढच्या सर्वच गावांना फटका बसला. नदीकाठच्या घरात पाणी शिरलं काही घर पाण्यामुळे कोसळली. तर नदीकाढच्या भातशेतीचं अतोनात नुकसान झाले आहे. भातशेती जमिनीसहित वाहून गेल्याने भातशेतीच्या मळ्यात नदीचं स्वरूप आलं आहे. कर्ली नदीने पात्राबाहेर वाहायला सुरवात केल्याने मुंबई गोवा महामार्गावर पावशी येथे पाणी आल्याने महामार्ग काही काळ ठप्प होता.