नाशिक : आमचं सरकार असताना रश्मी ठाकरे यांना मी सिद्धिविनायकाचं अध्यक्षपद घ्या म्हणून आग्रह धरला होता. याबाबत मी उद्धव ठाकरे यांना स्वतः बोललो होतो. मात्र त्यांनी ते घेतलं नाही. त्यावेळी ठाकरे कुटुंब स्वतःसाठी काही घेत नाही असं मला तेव्हा म्हटलं होतं, पण आता ठाकरे सगळच घेत आहेत, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. नाशिकमध्ये भाजप कार्यालयात कोअर कमिटीची बैठक आज आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, कुठलाही अनुभव नसताना त्यांनी मुलाला कॅबिनेट मंत्री केलं आहे. आता वहिनींना सामनाचं संपादक केलं आहे. वहिनी सामनाचं संपादक पद खूप चांगलं सांभाळतील, असंही ते म्हणाले.


यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, संजय राऊत नाराज आहेत हे मनाचे खेळ आहेत. गेल्या 3-4 महिन्यात आपण बघितले आहे. सत्तेचा फेविकॉल इतका पक्का आहे की त्यांची नाराजी संध्याकाळी दूर होते.

नाशिक भाजपमधील अंतर्गत वादाच्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले की, नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी वगैरे नाही. हे शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस सारखं असतं. सकाळी नाराजी असते संध्याकाळी एकत्र चहा घेतात. मतं वेगळ असतात आणि हे नैसर्गिक आहे, असं ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबई महापालिकेत 8 चे 60 नगरसेवक आणू या वक्तव्यावर बोलताने ते म्हणाले की, अजित पवार यांच्याकडे जादूची कांडी असेल. अजित पवार हे असे व्यक्तिमत्व आहे की जे अडचणीत असतात तेव्हा खूप शांत असतात आणि जेव्हा अडचणीतून बाहेर येतात तेव्हा त्यांचा आकाशाला हात भिडतो. त्यामुळे 8 चे 60 ते करतीलही काही सांगता येत नाही, असंही पाटील म्हणाले.

Chandrakant Patil | एका रात्रीत शपथ, मग निर्णय का नाही? चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना टोला 


यावेळी पाटील म्हणाले की, नागपूर अधिवेशन आम्ही सहा दिवस रोखून धरलं होतं. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणी करत होतो. मात्र सरकारने शेवटच्या दिवशी घाईघाईने कर्जमाफी केली. उद्धव ठाकरे म्हणाले होते सातबारा कोरा करायचा, मात्र तसं काही झालं नाही. प्रत्यक्ष कर्जमाफी फसवी केली. पीककर्जाने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही. मग इतर लोनचं काय? वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिलेलं नाही. मागच्या सरकारने 25 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिलं होतं तुम्ही काय दिलंत? पीक कर्जव्यतिरिक्त इतर कर्ज माफ करणार का? असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी केला.

Chandrakant Patil | शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी म्हणजे निव्वळ धुळफेक : चंद्रकांत पाटील


यावेळी मुस्लिम आरक्षणावर बोलताना ते म्हणाले की, सध्या मुस्लिमांना फसवणं चालू आहे. 5 टक्के मुस्लिम आरक्षण घटनेच्या चौकटीत बसत नाही आणि म्हणतात कोर्टाने स्टे दिला. मुस्लिमांना पाच टक्के दिलेल्या आरक्षणाने मराठा समाजाला दिलेलं आरक्षण आणि परंपरागत असलेलं OBC आरक्षण यावर गदा येऊ शकते. मुस्लिमांच्या डोळ्यात धूळ फेकली जात आहे, असंही ते म्हणाले. वर्षानुवर्षाचा बंधुभाव यांनी बिघडवला. CAA च्या नावाखाली तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवली जात आहे. पवार साहेबांनी आम्हाला CAA बद्दल समजून सांगावं काय प्रॉब्लेम आहे? हे फक्त नक्षलवाद्यांच्या प्लॅनला बळ द्यायचं चालू आहे, असा आरोप देखील त्यांनी केला.