एक्स्प्लोर
इतिहासकालिन नाण्याचा लिलाव, बोली तब्बल 480000 रुपयांची
याचं वजन 11 ग्रॅम एवढं असून शहाआलम कालिनच दुसऱ्या नाण्याला 2 लाख 80 हजार रुपयाची बोली लागली.

नाशिक : काळ लोटला तशी नाणी चलनातून बाद होत गेली. मात्र नाशिकमध्ये दुर्मिळ नाणे प्रदर्शनाच्या लिलावात तत्कालीन गुलशनाबाद अर्थात नाशिकच्या टांकसाळीमधील शहाआलम कालिन चांदीच्या नाण्यासाठी तब्बल 4 लाख 80 हजारांची विक्रमी किंमत मोजली गेली. नाशिक शहरात हा चर्चेचा विषय बनलाय. याचं वजन 11 ग्रॅम एवढं असून शहाआलम कालिनच दुसऱ्या नाण्याला 2 लाख 80 हजार रुपयाची बोली लागली. शनिवार आणि रविवारी या दोन दिवसीय प्रदर्शनात शनिवारी रात्री हे लिलाव पूर्ण झाले. पुरातत्व विभागाकडून मान्यताप्राप्त कंपन्यांकडून हे लिलाव पार पडले. नाण्याची उपलब्धता आणि दुर्मिळता यावर त्याचं मूल्य ठरतं. वैभवशाली ऐतिहासिक आणि संस्कृतीचे साक्षीदार असलेले दुर्मिळ आणि मौल्यवाण नाणी, शिवराई, मुघल काळातील चांदी आणि सोन्याची नाणी, विविधरंगी आणि कालबाह्य झालेल्या नोटा.. परदेशी चलन.. सुलतान, निजाम या संस्थानांची नाणी.. पोस्टांच्या तिकिटांसह स्वातंत्र्यकाळापूर्वीच्या आणि नंतरच्या ऐतिहासिक वस्तू या आणि अशा अनेक दुर्मिळ आणि अनोख्या गोष्टी बघण्याचा अनुभव सध्या नाशिककर घेत आहेत. गंगापूररोड वरील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये 'रेअर फेअर 2018' या प्रदर्शनाच्या माध्यमातून नाशिककरांना हा अनुभव घेता येत आहे. कलेक्टर्स सोसायटी ऑफ न्युमिस्मॅटिक अँड रेअर आयटम्स या संस्थेतर्फे नागरिकांमध्ये इतिहासाची आवड निर्माण व्हावी, अशा वस्तूंचा संग्रह आणि छंद बाळगणाऱ्या व्यक्तींना एक व्यासपीठ मिळावं या दृष्टीने रविवारपर्यंत हे दोन दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. यामध्ये इंदूर, हैदराबाद, मुंबई पुणे यांसह नाशिकमधील जवळपास 40 संग्रहकांनी आपले स्टोल्स उभारले. या प्रदर्शनाला नाशिककरांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे
राजकारण






















