नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या (Nashik Teachers Constituency Election 2024) जागेसाठी बुधवारी (दि. 26) मतदान पार पडले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 93.48 टक्के मतदान झाले. नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 21 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, 1 जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र निकालाआधीच अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांचे विजयाचे बॅनर झळकल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.  


नाशिक शिक्षक मतदारसंघात 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी प्रामुख्याने चौरंगी लढत पाहायला मिळाली. महायुतीतून (Mahayuti) शिवसेना शिंदे गटाने किशोर दराडे (Kishor Darade) यांना उमेदवारी दिली होती. तर महायुतीकडून अजित पवार गटाने महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने महायुतीत बिघाडी झाल्याचे दिसून आले होते. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने संदीप गुळवे (Sandeep Gulve) यांना उमेदवारी दिली होती. तर विवेक कोल्हे हे अपक्ष निवडणुकीच्या (Elections 2024) रिंगणात उतरले. आता या चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार? याचे चित्र 1 जुलैला सपष्ट होणार आहे. 


निकालाआधीच कोपरगावमध्ये विवेक कोल्हेंच्या विजयाचे बॅनर


निकालाआधीच कोपरगावमध्ये (Kopargaon) विवेक कोल्हे यांचे विजयाचे बॅनर झळकले आहे. विवेक कोल्हे यांच्या समर्थकाने अभिनंदनाचे फलक लावले असून मी विवेक स्नेहलता बिपिन दादा कोल्हे ईश्वर साक्षी शपथ घेतो की, असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे. या बॅनरची सध्या नाशिक शिक्षक मतदारसंघात जोरदार चर्चा होत आहे. आता एक जुलैच्या निकालाकडे सर्वांचे लागले लक्ष आहे. 


 नथ, ड्रेस आणि पैशांच्या पाकिटामुळे गाजली निवडणूक


दरम्यान, नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक नथ, ड्रेस आणि पैशांच्या पाकिटामुळे चांगलीच गाजली. शिक्षक मतदारांच्या घरी अगदी पैठणी साड्या, सोन्याची नथ व सफारी ड्रेस वाटपासह बंद पाकिटात नोटांचे बंडल शिक्षकांच्या हाती दिल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या. मतदानाच्या दिवशीही हे वाटप सुरू होते. शिक्षकांच्या या कृतीची मतदारसंघात चर्चा झाली. 


मतदान केंद्राबाहेर पैसे वाटप करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल 


दरम्यान, नाशिकमधील एका मतदान केंद्राबाहेर पैसे वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. आता पैसे वाटप करणाऱ्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर दराडे यांच्या बूथ मागे पैसे वाटप सुरू होते. 69 हजार 500 रुपये वाटताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संशयिताला रंगेहाथ पकडले. संशयित आरोपी विलास नरवडे विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


निवडणुकीला गालबोट, मतदान केंद्राबाहेर पैशाच्या पाकिटांसह एकास पकडलं; ठाकरेंचे कार्यकर्ते संतप्त


वडिलांचं वय झालं, आई आजारी, मुलाचं शिक्षण....फिरण्यासाठी प्रचंड पैसा लागतो, स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्षाचा जड अंतकरणाने राजीनामा