नाशिक : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या  द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान (Voting) होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरु झाली असून दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 39 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. काही किरकोळ घटना वगळता हे मतदान शांततेत आणि सुरुळीत सुरू आहे. मात्र, नाशिकमधील (Nashik) एका मतदान केंद्राबाहेर पैसे वाटप करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या एक दिवस अगोदर येवल्यातही शिक्षकांना मतदानासाठी पैसे वाटप करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. निवडणूक विभागाचे अधिकारी तसेच पोलिसांनी (Police) विठ्ठल नगर परिसरात मतदारांना 5 हजार रुपयांचे पॉकेट देताना कोल्हेंच्या समर्थकांना पकडले होते. आता, आणखी एकास पैसे वाटप करताना ताब्यात घेण्यात आले.
  

 

नाशिकमधील बी.डी.भालेकर मतदान केंद्राच्या बाहेर चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. येथील मतदान केंद्राबाहेरच मतदारांना पैशांचे पाकिटे वाटप करण्यात येत असल्याचे निदर्शना आले आहे. पैशाचे पाकिटं वाटप करणाऱ्यास शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडले. या पाकिटांमध्ये 500 च्या नोटा आणि मतदार स्लिप आढळून आल्या आहेत. दरम्यान, पैशाची पाकिटं असणाऱ्या व्यक्तिला पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आले आहे. संबंधित व्यक्ती महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्याशी निगडीत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. 

69,500 रुपये जप्त


4 खाकी पाकीटं सापडली असून प्रत्येक पाकिटात 5000 असे एकूण 20,000 रुपये आढळून आले आहेत. पांढऱ्या रंगाचे 49  पाकीट होते, या पाकिटात प्रत्येकी 1000 असे एकूण  49,000 रुपये पोलिसांना आढळून आले आहेत.  तर, एका पाकिटात  500 रुपये असे एकूण 69,500 रुपये पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. 

मंगळवारीच 2 जणांना घेतलं ताब्यात


शिक्षक मतदारसंघाची आज निवडणूक होत असून निवडणूकपूर्वी पोलीस आणि तहसील विभागाच्या पथकाने मनमाडला मोठी कारवाई केली होती. मतदारांना देण्यासाठी तयार करण्यात आले पैशांचे पाकीट पोलिसांनी मंगळवारी जप्त केले होते. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गणेश नगर भागात छापा मारुन पैसे असलेली पाकिटे जप्त केली. या पाकिटांसोबत उमेदवार विवेक कोल्हे यांचे पॉम्लेटही आढळून आले होते. याप्रकरणी, दोन जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. त्यातच, आज आणखी एकास पैसे वाटप करताना अटक करण्यात आली आहे. 

नाशिक शिक्षक मतदार संघासाठी विभागात 3 वाजे पर्यंत सरासरी 64.41 % मतदान


- नंदुरबार जिल्ह्यात 72.69 टक्के 

- धुळे जिल्हा 67.41 टक्के 

- जळगाव जिल्हा 61.13 टक्के 

- नाशिक जिल्हा 66.11 टक्के

- अहमदनगर जिल्हा 60.42 टक्के  

 

दरम्यान, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ एकूण मतदार संख्या 69,368 आहे.