Nashik Lok Sabha Constituency : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांनी अखेर बंडखोरी केली असून करंजकर यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय.
करंजकर अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) हा मोठा झटका मानला जात आहे. येत्या दोन दिवसात ते आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. विशेष म्हणजे माझ्या सोबत भगूर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिकमधील 27 ते 30 नगरसेवक तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य असल्याचा दावा त्यांनी करत एकप्रकारे ठाकरे गटाला इशारा दिला आहे.
विजय करंजकरांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज
करंजकर हे महाविकास आघाडीकडून नाशिकच्या जागेसाठी इच्छुक होते. मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट करून राजाभाऊ वाजेंना तिकीट देण्यात आल्याने करंजकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर महायुतीकडूनही निवडणूक लढवण्यास करंजकर इच्छुक होते. महायुतीच्या नेत्यांच्या त्यांनी भेटीगाठी देखील घेतल्या होत्या. मात्र महायुतीकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर आज विजय करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
खालच्या काही लोकांनी चुकीची फिडिंग लावली
अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विजय करंजकर यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. ते म्हणाले की, वर्षभर मी मतदारसंघात प्रचार केला आहे. ऐनवेळी माझ्या उमेदवारीला ब्रेक लावण्यात आला आहे. खालच्या काही लोकांनी चुकीची फिडिंग लावली. कोणी चुकीचे मेसेज दिले याची नोंद पक्ष घेईल, इकडून तिकडून आलेल्या उपटसुंडाच्या जीवावर पक्ष चालत नसतो.
मी रोज व्यायाम करणारा माणूस
संजय राऊत यांच्याशी तुम्ही नाराजीवर चर्चा केली का? अशी विचारणा केली असता ते म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मला दोन वेळा मातोश्रीवर बोलावले पण खालून त्यांना सांगण्यात आले की, खूप गर्दी येईल नका बोलावू असं म्हणत भेटीला ब्रेक लावण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलले होते की, तुम्ही आजारी होते म्हणून मातोश्रीला भेटायला गेले नाही. यावर विजय करंजकर म्हणाले की, मी आजारी वगैरे नव्हतो मी दुसऱ्यांना आजारी पाडतो, मी एक तास रोज व्यायाम करणारा माणूस आहे. मी चांगल्या चांगल्यांची तब्येत बिघडवेल, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
विजय करंजकरांचा ठाकरे गटाला इशारा
विजय करंजकर पुढे म्हणाले की, प्रत्येक पदाधिकारी पक्षात विश्वासाच्या आधारावर राहत असतो. पण त्याला दाबण्याचा करण्याचा प्रयत्न होत असेल तर तो पदाधिकरी पक्षात राहणार नाही. येणाऱ्या काळात तुम्हाला कळेल. भगूर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिकमधील 27 ते 30 नगरसेवक तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य माझ्या समवेत आहेत. भाजपमध्ये मी जाणार अशी चर्चा आहे, चर्चा होत राहतात. मी सध्या तरी ठाकरेंच्या पक्षात आहे पुढे बघू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
आणखी वाचा