Bharti pawar Property : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात (Dindori Lok Sabha Constituency) भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉ. भारती पवार (Bharti pawar) यांना उमेदवारी जाहीर केली. काल (दि. 02) भारती पवार यांनी नाशिकमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 


भारती पवार (Bharti Pawar) यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर माकपचे माजी आमदार जे पी गावित (J P Gavit), भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण (Harishchandra Chavan) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून मालती थविल (Malati Thavil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे दिंडोरीत बहुरंगी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.   


भारती पवारांची संपत्ती किती?


महायुतीच्या दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांच्या संपत्तीत पाच वर्षांत दुपटीने वाढ झाल्याचे चित्र आहे. 2019 च्या निवडणुकीपूर्वी त्यांच्या नावे एकूण 83 लाखांची जंगम व स्थावर मालमत्ता होती. आता त्यांची संपत्ती 2 कोटी 13 लाखांवर जाऊन पोहोचली आहे. विशेष म्हणजे त्यांचे पती प्रवीण पवार यांच्याही संपत्तीत दुपटीने वाढ झाल्याचे डॉ. पवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून दिसून येते. अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत नऊ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती प्रवीण पवार यांनी महायुतीतर्फे अर्ज सादर केला. अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती निवडणूक आयोगाला कळवली आहे.


भारती पवारांच्या नावे एक रुपयाचेही कर्ज नाही 


2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी डॉ. भारती पवार यांची कौटुंबिक संपत्ती 13 कोटी रुपयांची होती. डॉ. पवार यांच्या नावे 2019 मध्ये 53 लाख 42 हजारांची जंगम मालमत्ता होती. ती आता 63 लाखांवर पोहोचली आहे. तर 30 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता 2024 मध्ये दीड कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. यात मखमलाबाद येथील प्लॉटचे बाजारमूल्य वाढल्याचे दिसून येते. डॉ. भारती पवारांकडे साडेपाच लाखांचे 80 ग्रॅम सोने आहे. तर जवळपास दीड किलो चांदी (एक लाख आठ हजार रु.), सोळा लाखांच्या विविध बँकांमध्ये ठेवी, दहा लाखांची एलआयसी विमा त्यांच्या नावे आहे. बँक बडोदाचे नऊ लाखांचे शेअर्स त्यांनी घेतल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे त्यांच्या नावे एक रुपयांचेही कर्ज नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 


पतीच्या नावे 19 कोटींची स्थावर मालमत्ता 


त्यांचे पती प्रवीण पवार यांच्या नावे एक कोटी सहा लाखांची जंगम मालमत्ता तर 19 कोटी 34 लाख 81 हजारांची स्थावर मालमत्ता आहे. यात विविध ठिकाणी खरेदी केलेला जागा, प्लॉट्स व वडिलोपर्जित संपत्तीचा समावेश आहे. प्रवीण पवार यांच्या नावे पावणेतीन लाखांचे कर्जही असल्याचे दिसून येते. 


दिंडोरी लोकसभेतून कोण बाजी मारणार?


दरम्यान, दिंडोरी मतदारसंघात पल्लवी भास्कर भगरे यांनीही अर्ज सादर केला. त्यांच्या नावे १६ लाखांची चल संपत्ती आहे. तर अपक्ष उमेदवार बाबू भगरेंच्या नावे ७२ हजारांची चल व चार लाखांची अचल संपत्ती असल्याचे दिसून येते. दिंडोरी लोकसभा मतदार संघात भारती पवार यांनी दुसऱ्यांदा उमेदवारी मिळविली आहे. मागील वेळेस पहिल्याच प्रयत्नात त्यांनी खासदार म्हणून निवडून येत केंद्रात मंत्रिपदही पटकावले होते. यावेळी मात्र, त्यांना कांदा प्रश्नाने चांगलेच घेरले आहे. आता दिंडोरी लोकसभेतून कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 


आणखी वाचा 


Hemant Godse : आलिशान गाड्या, सोने, शेअर्ससह अनेक कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक, हेमंत गोडसेंची संपत्ती नेमकी आहे तरी किती?