Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांचा पत्ता कट होऊन सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर नाराज होते.
विजय करंजकर यांच्या नाराजीनंतर त्यांना मातोश्रीवरून (Matoshri) दोन वेळेस बोलावण्यात आले होते. मात्र दोन्ही वेळेस विजय करंजकर यांनी मातोश्रीकडे पाठ फिरवली. विजय करंजकर नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्व नाशिककरांचे लक्ष लागले होते.
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंडखोरी
अखेर विजय करंजकर यांनी आज बंडखोरी केली आहे. विजय करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. विजय करंजकर हे महाविकास आघाडीकडून नाशिकच्या जागेवरून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. महाविकास आघाडीकडून त्यांचा पत्ता कट झाल्यानंतर त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. त्यानंतर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून त्यांनी महायुतीतून देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. विजय करंजकर हे शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Faction) प्रवेश करणार, अशा चर्चा देखील काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या.
महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार?
दरम्यान, महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली. काल (दि. 02) हेमंत गोडसे यांनी नाशिकमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आज अखेर विजय करंजकर यांनी अपक्ष उमदेवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) डोकेदुखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या