नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नाशिकमध्ये (Nashik) येताना आपल्यासोबत पैशांनी भरलेल्या बॅगा घेऊन आल्याचे त्यांनी म्हटले. यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. आता यावरून शिवसेना नेते व उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 
 
उदय सामंत म्हणाले की, माझ्या गाडीमध्ये देखील आता बॅगा आहेत. त्यामध्ये कपडे आहेत. कुणाला आवश्यकता असेल टीका करणाऱ्यांना तर माझ्याकडे देखील आहे.  स्वतःच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आपले उमेदवार निवडून येत नाही याची जाणीव झाली की अशा पद्धतीचे फालतू आरोप होतात. संजय राऊतांना कोणीही किंमत देत नाही. 


मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय


काल नाशिकमध्ये सर्व संस्थांचा मेळावा होता. त्याला जवळपास 1 हजार प्रतिनिधी उपस्थित होते. शंभर ते दीडशे संस्था एकत्र झाल्या होता. कदाचित एवढा प्रतिसाद मिळाल्यानंतर हा पोटशुळ उठलाय. सीट जाणार आहे याची जाणीव झाल्याने आरोप प्रत्यारोप करायचे काम सुरु आहे. मग बॅगेत काय होतं ते तपासायचं. मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय. हीच अनेक लोकांना पोटदुखी आहे आणि याच पोटदुखीतून अशा पद्धतीचे आरोप केले जातायत. ज्या पक्षाला ज्या आघाडीला रिस्पॉन्स मिळत नाही त्या आघाडीच्या नेत्यांना अशा पद्धतीची दुर्बुद्धी सुचते. ही दुर्बुद्धी सुचल्यामुळेच अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होतायत, अशी टीका उदय सामंत यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.


उदय सामंतांचा रोहित पवारांना टोला


कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक्स या सोशल माध्यमावर पोस्ट करत अहमदनगरमध्ये भाजपकडून पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला. यावर उदय सामंत म्हणाले की, ही यंत्रणा अशी असते, स्वतःच पाच दहा हजार रुपये लोकांच्या हातात द्यायचे, ते शूटिंग करायचं  आणि तेच पैसे आम्ही वाटतोय, असे आरोप करायचे.  हा धंदा महाराष्ट्राच्या जनतेला देखील कळतो.  पराभव समोर दिसायला लागला की त्याचं खापर कुणावर तरी फोडायचं आणि म्हणून असे आरोप करायचे.  एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या आम्हा सर्व लोकांना बदनाम करणं हा एकमेव धंदा काही लोकांचा आहे. मात्र या निवडणुकीनंतर हे सर्व राजकीय नेस्तनाबूत होतील, असे त्यांनी म्हटले आहे.  


आणखी वाचा 


Sanjay Raut: मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण! एकनाथ शिंदेंच्या बॉडीगार्डसच्या हातात पैशांनी भरलेल्या बॅगा, संजय राऊतांचा आरोप