नाशिक: राज्यात सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाची धावपळ सुरु असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नाशिकमध्ये येताना आपल्यासोबत पैशांनी भरलेल्या बॅगा आणल्याचे त्यांनी म्हटले. राज्याच्या विविध भागांमध्ये भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप सातत्याने विरोधक करत आहेत. मात्र, आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आपल्या हेलिकॉप्टरमधून मतदारांना वाटण्यासाठी पैसे आणल्याचा आरोप केला आहे. 


संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ नाशिकमधील आहे. या व्हिडिओत मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस... दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहत आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर केलेल्या या आरोपाला आता सत्ताधारी नेते काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.


व्हिडिओत नेमकं काय?


या व्हिडिओत  एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरलेले दिसत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून बाहेर पडले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या अंगरक्षकांचा ताफा आहे. या ताफ्यातील दोन अंगरक्षकांच्या हातात सुटकेस आणि बॅग दिसत आहे. या बॅगांमध्ये नेमके काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, मुख्यमंत्री दोन तासांच्या नाशिक दौऱ्यासाठी इतक्या बॅगा का घेऊन आले?, असा सवाल करुन संजय राऊत यांनी पैसेवाटपाची शंका उपस्थित केली आहे.


पुणे आणि नगरमध्ये भाजपकडून पैसे वाटपाचा आरोप


पुण्यात भाजपकडून मतदानाच्या आदल्या दिवशी पैसेवाटप सुरु असल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. त्यासाठी धंगेकर यांनी पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यासाबेर ठिय्या आंदोलन केले होते. तर नगरमध्येही पैसेवाटप झाल्याचा आरोप शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी केला आहे. ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे, अशी प्रतिक्रिया लंके यांनी दिली. 




आणखी वाचा


बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस; भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर