Nashik Accident News News नाशिक : शहरासह जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरात वेगवेगळ्या परिसरात तीन अपघाताच्या घटना घडल्या आहेत. बिटको सिग्नल, तपोवन चौफुली आणि खुटवडनगर परिसरात या घटना घडल्या आहेत. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.  


अज्ञात वाहनाच्या धडकेत वायोवृद्धाचा मृत्यू


अपघाताची पहिली घटना ही बिटको सिग्नलजवळ घडली आहे. बिटको सिग्नलवरून (bytco Signal) पायी चालणाऱ्या वयोवृध्दाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात बापूराव जाधव (60, रा. नाशिक) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी बिटको रुग्णालयात (Bytco Hospital) दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात (Civil Hospital) नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashikroad Police Station) नोंद करण्यात आली आहे.


दुचाकीचालकाला अज्ञात वाहनाची धडक; एकाचा मृत्यू


अपघाताची दुसरी घटना तपोवन चौफुली जवळ घडली. तपोवन चौफुली येथील मेट्रो मॉलजवळून जाणाऱ्या मोटारसायकलस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत खान अरमान अहमदखान (25, रा. गल्ली नंबर 2, गणेशनगर, वडाळा गाव, नाशिक) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुगणालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत अब्दुल खालिक आसिक खान (रा. खोडेनगर, नाशिकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


वाहनाची मोटारसायकलीला धडक; एक जखमी


अपघाताची तिसरी घटना खुटवडनगर परिसरात घडली आहे. वाहनाने मोटारसायकलीस जोरदार धडक दिली. यात एक जण जखमी झाला आहे.  याबाबत शिवम एकबहादूर सोनार (रा. विजया पार्क, वृंदावननगर, डीजीपीनगर, अंबड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. 


फिर्यादीत म्हटले आहे की, सोनार हे मोटारसायकलीने खुटवडनगर येथील सुखकर्ता हॉस्पिटलच्या समोरून मोटारसायकलीने जात होते. त्यावेळी युवराज संतोष वाघ (रा. वृंदावननगर, व्ही. के. पाटील शाळेजवळ) याने भरधाव वेगात वाहन चालवून सोनार यांच्या मोटारसायकलीस धडक दिली. यात सोनार यांना दुखापत झाली आहे. तसेच मोटारसायकलीचे नुकसान देखील झाले आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार टोपले करीत आहेत.


आणखी वाचा


Nashik Crime News : संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी अन् औरंगजेबाच्या कबरीशी तुलना; अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल