Nashik: नाशिकमध्ये विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वारास वाहतूक पोलिसाने हटकले असता सदर युवकाने पोलिसाला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती अद्यापही कायम आहे. मात्र, नागरिक न जुमानता सर्रास विना हेल्मेट प्रवास करताना दिसतात. ज्यामुळं नाईलाजानं पोलिसांना संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी लागते.
दुचाकीस्वराचा पोलिसावर हल्ला
दरम्यान, अशीच कारवाई करताना वाहतूक पोलिसांना महागात पडली आहे. हेल्मेट न घातल्याने वाहतूक पोलिसाने इ- चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केल्याचा राग आलेल्या संशयित दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केली. तसेच, त्यांच्याकडील ई- चलन मशिन फोडले. यावेळी आलेले मुंबई नाका पोलिसांशीही हुज्जत घातली. त्यानंतर सदरच बेशिस्त दुचाकीस्वाराला सरकारवाडा पोलिस ठाण्यात नेले असता, तेथेही त्याने गोंधळ घालत ठाणे अंमलदारावर रॉडने हल्ला करीत त्यांना जखमी केले.
नेमकं प्रकरण काय?
याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करून संशयितास अटक करण्यात आली आहे. रितेश अशोक ललवाणी (वय 30, रा. मधुकमलनगर, सावरकरनगर) असे संशयिताचे नाव आहे. वाहतूक शाखेचे हवालदार साहेबराव गवळी हे सोमवारी (20 जून) टिळकवाडी सिग्नल येथील जलतरण तलावाजवळ कर्तव्यावर होते. या वेळी दुचाकीवरून संशयित रितेश विनाहेल्मेट आला. त्यास गवळी यांनी रोखत ई- चलनमार्फत दंडात्मक कारवाई करीत होते. यावेळी रितेशने हवालदार गवळी यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करीत त्यांच्याकडील ई चलन मशिनही फोडले.
पोलीस ठाण्यातच पोलिसाला मारहाण
वाहतूक शाखेचे पोलिस अंमलदार संजय जगताप, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे दोन पोलिस तेथे आले. त्यांनाही रितेश याने दमदाटी करीत धक्काबुक्की केली. अखेर पोलिसांनी त्यास सरकारवाडा पोलिस ठाण्यात नेले असता, तेथेही त्याने गोंधळ घातला. यावेळी रितेश याने लोखंडी रॉड उचलून पोलिस ठाण्यातील अंमलदार योगेश वायकंडे यांना मारले. त्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. याप्रकरणी हवालदार गवळी यांच्या फिर्यादीनुसार रितेश ललवाणी यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली.
हे देखील वाचा-