Aurangabad News: औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका भोळसर महिलेवर अत्याचार नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या असून, त्याच्यावर शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमसिंग भन्साराम मैवाळ (रा. तरबाची वाडी, ता. वैजापुर, जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील एका गावातील भोळसर महिला शिऊर बंगला परिसरात फिरत होती. याचाच फायदा घेत आरोपी मैवाळ याने तिला रविवारी रात्रीच्या सुमारास शिऊर बंगला ते शिऊर रस्त्यावरील नवीन मंदिराच्या पाठीमागे घेऊन गेला. त्यांनतर तिथे असलेल्या मोकळ्या जागेवर नेऊन पिडीत महिलेवर बळजबरीने अत्याचार केला. सकाळी महिलेने घडलेला सर्व प्रकार आपल्या भावाला सांगितला. त्यांनतर दुसऱ्या दिवशी घटना उघडकीस आली.
बुटावरून सापडला आरोपी...
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी पोलीस पथकाला घटनास्थळी आरोपीचा बूट सापडला. त्यांनतर पोलिसांनी पिडीत महिलेची विचारपूस करून काही महिती घेतली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. सोबतच श्वान पथकास बोलावून बुटाच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. यावेळी प्रेमसिंग भन्साराम मैवाळ हाच आरोपी असल्याचे समोर आले. त्यांनतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन तासात आरोपी ताब्यात...
एका भोळसर महिलेवर अत्याचाराच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे आरोपीचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आवाहन होते. मात्र पोलिसांनी गोपनीय माहिती आणि श्वान पथकाच्या मदतीने कौशल्यपूर्ण तपास करत अवघ्या दोन तासात आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अंकुश नागटिळक करत आहेत.