Sant Nivruttinath Maharaj Yatra 2024 : नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रेला (Sant Nivruttinath Maharaj Yatra 2024) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यामुळे त्र्यंबकनगरी दुमदुमून गेली आहे. टाळ मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष सर्वत्र केला जात आहे. वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. निवृत्तीनाथ मंदिर परिसरात दर्शनासाठी जवळपास दोन किमीपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत. पहाटे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या हस्ते संत निवृत्तीनाथ महाराज समाधीची महापुजा करण्यात आली. 


संत निवृत्तीनाथ संजीवन समाधी मंदिरात आलेल्या दिंडीला मुख दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. दर्शनबारी आहोरात्र सुरू आहे. दिंडीतील विणेकरी भक्तांचा सन्मान करण्यात येत आहे. यावर्षी बाहेरच्या राज्यातील दिंड्यांची संख्या लक्षणीय आहे. रविवारी दुपारी अंजनेरीजवळील ब्रह्मा व्हॅली महाविद्यालयात श्री क्षेत्र जायखेड्याच्या (Jaikheda) हजारो वारकऱ्यांचा शिस्तबद्ध आणि नयनरम्य, असा भव्य रिंगण सोहळा पार पडला आहे. 


आठ हजार वारकऱ्यांच्या पायाची आयुर्वेदिक मसाज


लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे पतसंस्थेच्या फिरत्या दवाखान्याद्वारे संत निवृत्तीनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या दिंड्यांतील वारकऱ्यांवर मोफत उपचार सुरू आहेत. चार दिवसांत पाय सुजलेल्या आठ हजार वारकऱ्यांच्या पायाची आयुर्वेदिक मसाज करून देण्यात आली. १० हजार वारकऱ्यांवर मोफत औषधोपचार करण्यात आले. तर गंभीर आजार आढळून आलेले १५० जणांना सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आले. 


पोलिसांचा चोख बंदोबस्त


त्र्यंबकमध्ये यंदाच्या यात्रेसाठी होणार्‍या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस (Police) प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये 2 डीवायएसपी, 6 पीआय, 21 पुरुष पीएसआय व एपीआय, 4 महिला अधिकारी, 210 पोलीस अंमलदार पुरुष आणि 60 महिला व पुरुष अंमलदार यांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाच्या यात्रेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. 


सीसीटीव्हींची करडी नजर


त्र्यंबकेश्वर येथील यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून भाविक येत असल्याने वारकर्‍यांची मोठी गर्दी होते. त्यावेळी या गर्दीचा फायदा घेत काही चोरटे संधी साधण्याची शक्यता असते. तसेच लहान मुले देखील गर्दीत हरवत असतात. त्यासाठी त्र्यंबक नगरपरिषदेने चोख व्यवस्था केली असून शहरातील विविध ठिकाणी ४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच नगरपरिषदेत सर्व विभागांसाठी वॉर रूम तयार करण्यात आले असून यामध्ये यात्रेत हरवलेल्या व्यक्ती शोधण्यासाठी स्वतंत्र वॉर रुमची व्यवस्था करण्यात आली आहे.


आणखी वाचा 


Sant Nivruttinath Maharaj Yatra 2024 : धक्कादायक! त्र्यंबकेश्वरमध्ये वारकऱ्यांना दमदाटी, साधूंनी हातात चाकू घेत वारकऱ्यांचे तंबू उखडले