Sant Nivruttinath Maharaj Yatra 2024 नाशिक : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेस उद्यापासून (दि. 06) सुरुवात होत आहे. यानिमित्ताने अनेक वारकरी (Warkari) त्र्यंबक नगरीत दाखल झाले आहेत. सुमारे पाच लाख भाविक आणि 600 हून अधिक दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. अशातच एक धक्कादायक प्रकार त्र्यंबकमध्ये घडला आहे.


निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेला (Sant Nivruttinath Maharaj yatra 2024) आलेल्या वारकऱ्यांची त्र्यंबकेश्वरमध्ये अडवणूक केल्याचा आरोप वारकऱ्यांकडून करण्यात आला आहे. काही साधूंनी शिवीगाळ करत हाकलून दिल्याचे वारकऱ्यांचे म्हणणे आहे.  ज्या ठिकाणी वारकरी थांबले होते त्या ठिकाणी येऊन साधूंनी शिवीगाळ केल्याचे समजते. 


साधूंवर कडक कारवाईची मागणी


त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या आलेल्या भाविकांची निवासस्थान ठरलेले असते. दरवर्षीप्रमाणे वारकऱ्यांनी आपापल्या जागेवर आपले तंबू बांधले होते. मात्र काही साधूंनी येऊन ही जागा आमची आहे, असे म्हणत दमदाटी करून वारकऱ्यांवर शिवीगाळ केला. तसेच हातात चाकू घेऊन साधूंनी वारकऱ्यांचे तंबू उखडले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या साधूंवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे, या प्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


रहाट पाळण्यांना पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी


दरम्यान,  यात्रोत्सवात येणाऱ्या रहाट पाळण्यांना देखील सध्या शहरात जागा कमी पडतांना दिसत आहे. पूर्वी हे रहाट पाळणे संत निवृत्तिनाथ मंदिराकडे असायचे. मात्र, त्याठिकाणी जागा कमी पडू लागल्याने हे रहाट पाळणे सध्या शहरातील बसस्थानकाजवळ असणाऱ्या पार्किंगच्या जागेवर आणण्यात आले आहेत. परंतु, याही ठिकाणी जागा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे रहाट पाळण्यांना प्रशासनाने पुरेशी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.


त्र्यंबकला पार्किंगची अशी आहे व्यवस्था


बाहेरगावाहून येणार्‍या खासगी वाहनचालकांना गावात वाहने नेण्यास मनाई करण्यात येणार आहे. त्यामुळे या वाहनचालकांना त्र्यंबकेश्वरच्या प्रवेशद्वाराबाहेर जागोजागी उभारण्यात आलेल्या खासगी पार्किंगमध्ये आपली वाहने लावावी लागणार आहेत.


तमाशांच्या फडांना पुरेशी जागा मिळणे झाले कठीण 


त्र्यंबकेश्वर येथे अनेक वर्षांपासून यात्रेनिमित्त भाविकांच्या करमणुकीसाठी दोन ते तीन दिवस तामाशांचे फड येत असतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून तमाशांच्या फडांच्या जागेवर त्र्यंबक शहरात मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्याने त्यांना जागा मिळणे कठीण झाले आहे. येत्या कुंभमेळ्यापर्यंत त्र्यंबकमध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर इमारती उभ्या राहु शकतात. त्यामुळे प्रशासनाने दरवर्षी तमाशांच्या फडांना पुरेशी जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. जर असे झाले नाही तर भविष्यात त्र्यंबकला तमाशांचे फड येणे सुद्धा बंद होतील.


आणखी वाचा 


Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभेवरून ठाकरे गट आणि शरद पवार गटात जुंपली, महाविकास आघाडीत बिघाडी?