Sanjay Raut नाशिक : महाराष्ट्रात महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकेल. अजित दादांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपल्याने ते आता मोकळे झाले आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) धावपळ करतायत मात्र त्यांची आता ही शेवटची फडफड आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे राजकारणातील कच्चे मडके असल्याची घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिकमध्ये केली. 


नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंसाठी (Hemant Godse) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरणार आहेत. आज सायंकाळी व्यावसायिक, सामाजिक संघटना, शिक्षणसंस्था चालक आणि अन्य प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री संवाद साधणार  उद्योजकांसोबत देखील बैठक घेणार आहेत. याबाबत संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री पुरवठा करायला येत असतील.  डॅमेज कंट्रोल काय, धनुष्यबाण चोरला आहे.  


शिंदे धावपळ करतायत मात्र त्यांची शेवटची फडफड


शिंदे, अजितदादा आणि फडणवीस यांनी टेम्पो भरुन पैसे आणून दिले तरी काही होत नाही. मोदी महाराष्ट्रात ठाण मांडून बसले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकेल. अजित दादांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपल्याने ते आता मोकळे झाले आहेत. शिंदे धावपळ करतायत मात्र त्यांची आता ही शेवटची फडफड आहे, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.  


कुठे आहे ईडी आणि सीबीआय? 


नाशिक मनपा हद्दीतील 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा बाहेर काढणार, असा इशारा देत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. यावर विचारले असता संजय राऊत म्हणाले की, नाशिकच्या घोटाळ्याबाबत 14 तारखेला सविस्तर बोलणार आहे. नाशिकमध्ये 800 कोटींचा घोटाळा झाला आहे. मुख्यमंत्री, नगरविकास खाते आणि स्थानिक नेते या घोटाळ्यात सहभागी होते. ही लहान गोष्ट नाही. शेतकरी नसलेल्या बिल्डरांना भूसंपादनाच्या नावाखाली पैसे मिळाले आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. जनतेच्या पैशाची लुट कोणी करत असेल आणि नरेंद्र मोदी डोळ्याला पट्टी लावून बसणार असतील तर त्यांना दाखवावे लागेल की तुम्ही खोटारडे आहात. कुठे आहे ईडी आणि सीबीआय हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. 800 कोटींचा घोटाळा होतो ही काही लहान गोष्ट नाहीये. 


नंदुरबारमध्ये परिवर्तन होणार


नंदुरबार येथे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या सभेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडी पुन्हा काही सभा घेणार का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, नंदुरबार हा काँग्रेसचा गड राहिलेला आहे. यंदा नंदुरबारमध्ये महाविकास आघाडी जिंकणार आहे. इंदिरा गांधी त्यांच्या प्रचाराची सुरुवात वर्षानुवर्ष नंदुरबारमधून करत आलेल्या आहेत. यंदा प्रियांका गांधी आल्या. त्यामुळे नंदुरबारमध्ये परिवर्तन होणार आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 


बिफ एक्सपोर्टच्या माध्यमातून भाजपला मिळाले 550 कोटी


गोमास कंपनीकडून मोदींनी पैसे घेतले, असा आरोप संजय राऊत यांनी केला. यावर ते म्हणाले की, हा आरोप मी आज करत नाही आहे. बँकेतील निवडणूक रोख्यातील जी माहिती आली आहे त्यातून मोदींना पैसे मिळाले आहेत. बिफ एक्सपोर्टच्या माध्यमातून भाजपला त्यातून 550 कोटी मिळाले आहेत. 


बावनकुळे यांचा महाराष्ट्रातील संस्कृतीशी संबंध नाही


संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. ही मुलाखत काळू बाळूचा तमाशा असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला. यावर संजय राऊत म्हणाले की,  काळू बाळूचा तमाशा फार गाजला होता.  काळू बाळूचा तमाशा एक सांस्कृतिक तमाशा होता. बावनकुळेंनी त्याचा अपमान केलाय. बावनकुळे यांचा महाराष्ट्रातील संस्कृतीशी संबंध राहिलेला नाही, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला. 


फडणवीस राजकारणातील कच्चे मडके


संजय राऊत पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घेऊ नका. ते राजकारणातले एकदम कच्चे मडके आहे. नारायण राणे यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केले. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका हरलो आहे. हे फडणवीस यांना माहीत नसावे, असा टोला त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. 


आणखी वाचा 


Sanjay Raut : 'राज ठाकरे महाराष्ट्रद्रोहींच्या मांडीला मांडी लावून बसलेत', संजय राऊतांची खोचक टीका