Sanjay Raut नाशिक : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील, अशी टीका शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर केली आहे. तसेच संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा उल्लेख महाराष्ट्र द्रोही केला आहे. 


राज ठाकरे पुण्यातील जाहीर सभेत म्हणाले होते की,मशीदमधून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मत देण्याचे फतवे काढले जाणार असतील तर मी हिंदूंना फतवा काढतो की, त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मत द्यावी, यावर संजय राऊत म्हणाले की, काढा फतवा काढा. ते आता फतव्याकडे वळले आहेत. काही नेते आणि काही पक्ष यांची फार दखल घ्यावी, अशी महाराष्ट्रातील स्थिती नाही. 


देशात संविधान वाचवण्याची मोठी लढाई सुरु


महाराष्ट्रासह देशात संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरु आहे.  या देशातील लोकशाही, स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आलेले असताना  या देशातील सर्व जाती धर्माचे लोक संविधान वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरु इच्छित आहेत. मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करू इच्छित आहेत. 


राज ठाकरे महाराष्ट्र द्रोहींच्या मांडीला मांडी लावून बसलेत


त्याच वेळेला राज ठाकरे यांच्या सारखे नेते महाराष्ट्र द्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी. या ठाकरे  परिवाराने महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्याच कुटुंबातील एक व्यक्ती महाराष्ट्रावर औरंगजेबी चाल करून येणाऱ्या व्यक्तींना मदत करून इच्छित असेल प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा पवित्र आत्मा स्वस्थ बसणार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.  


मविआच्या सांगता सभेला अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार


अरविंद केजरीवाल यांना काल अंतरिम जामीन मंजूर झाला. याबाबत संजय राऊत म्हणाले की, आम्ही 17 तारखेला मुंबईत महाविकास आघाडीची सांगता सभा घेत आहोत. त्या सभेला आम्ही अरविंद केजरीवाल यांनी आमंत्रित केले आहे. अरविंद केजरीवाल यांनी आमचे आमंत्रण स्वीकारले आहे.  17 तारखेला मुंबईत नरेंद्र मोदी सुद्धा आहेत आणि त्याच वेळी महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर अरविंद केजरीवाल उपस्थित असतील, असेही यावेळी संजय राऊत म्हणाले. 


आणखी वाचा


Sanjay Raut : संजय राऊतांचे PM मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य, नाशिक भाजपने घेतला मोठा निर्णय