Lasalgaon News : लासलगाव (Lasalgaon) येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. लासलगावमध्ये भीषण पाणीटंचाई (Water Scarcity) निर्माण झाल्याने लासलगावकर ग्रामस्थांनी आज बंदची हाक दिली. नागरिक आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने लासलगावमध्ये कडकडीत बंद (Lasalgaon Closed) पाळण्यात आला. मागील २० दिवसांपासून शहरात पाणीपुरवठा न झाल्याने हा बंद पुकारण्यात आला आहे. तसेच होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर (Lok Sabha Election Voting) बहिष्कार टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 


पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी शनिवारी लासलगाव बंदची हाक दिली होती. त्यानुसार शहरातील सर्व दुकाने बंद ठेऊन लासलगावकरांनी कडकडीत बंद पाळला. 


लोकसभा मतदानावर बहिष्काराचा निर्णय


लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयात एमजीपीचे उपअभियंता व्ही. व्ही. निकम व शाखा अभियंता पी. एस. पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. ही योजना एमजीपीने चालवण्यास घ्यावी या योजनेच्या आतापर्यंत झालेल्या कामाची चौकशी करावी. नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी लेखी हमी द्यावी व पाणीपुरवठा योजनेचे सोलर पॅनल तत्काळ सुरू करावे, असे मुद्दे या बैठकीत मांडण्यात आले होते. मात्र, यात कोणताही तोडगा न निघाल्याने शेवटी नागरिकांनी शनिवारी लासलगाव बंदची हाक दिली. या प्रश्नी जोपर्यंत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष घालत नाही तोपर्यंत लोकसभा मतदानावर बहिष्कार निर्णयावर ठाम राहण्याचा निर्धार केला आहे.


नाशिक जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई 


नाशिक जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 20.84 टक्के पाणीसाठा शिल्लक राहीला आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात 28.05 टक्के पाणी आहे. मागील वर्षी हाच साठा 37.98 टक्के होता. कश्यपी धरणात 23.87 टक्के, गौतमी गोदावरी धरणात 18.4 टक्के, पालखेड धरण समूहातील पालखेड धरणात 11.64 टक्के, करंजवण धरणात 14.99 टक्के, वाघाड धरणात केवळ 3.95 टक्के पाणी शिल्लक राहिला आहे. तर ओझरखेड धरणात 0 टक्के पुणे गाव धरणात 0 टक्के तिसगाव धरणात 0.22 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या झपाट्याने वाढत असून, सद्यस्थितीत जिल्ह्यातील 296 गावांसह एकूण 1053 ठिकाणी 326 टँकरद्वारे प्रशासनाकडून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Marathwada Water Crisis : मराठवाड्यात फक्त 17 टक्के पाणीसाठा शिल्लक; अनेक भागात भीषण पाणीटंचाई, तीन प्रकल्प कोरडेठाक