कुबेरेश्वर धामहून जळगावचं कुटुंब पायीचं परतलं, मात्र वाटेत तीन वर्षीय अमोघचा मृत्यू
Rudraksh Mahotsav in Sehore : मध्य प्रदेशातील सिहोरच्या कुंबरेश्वर धाम येथील रुद्राक्ष महोत्सवात सहभागी होण्यासाठी जळगाव शहरातील शनिपेठेतील भट कुटुंब गेले होते.
Rudraksh Mahotsav in Sehore : मध्य प्रदेशातील कुबेरेश्वर धाम (Kubereshwar Dham) येथे रुद्राक्ष महोत्सवासाठी गेलेल्या जळगावमधील तीन वर्षीय दिव्यांग बालकाचा गर्दीत प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाल्याची घटना सिहोरमध्ये घडली आहे. मध्य प्रदेशातील सिहोरच्या कुंबरेश्वर धाम येथील रुद्राक्ष महोत्सवात सहभागी होण्यासाठी जळगाव शहरातील शनिपेठेतील भट कुटुंब गेले होते. गुरुवारी चेंगराचेंगरी झाल्याने हे कुटुंब पायी घराकडे निघाले. त्यात 3 वर्षीय अमोघ विवेक भट हा पायी चालला. प्रकृती ढासळल्याने त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात येऊन अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला शुक्रवारी सकाळी मृत घोषित केले.
दरम्यान अमोघला सेरेब्रल पाल्सी हा मेंदूविकार असल्याचे सांगितले जात आहे. विनोद भट हे दोन्ही मुल व त्यांच्या पत्नीसह खासगी वाहनाने मंगळवारी सिहोर येथे रुद्राक्ष महोत्सवासाठी गेले होते. तेथे गुरुवारी चेंगराचेंगरी झाल्यानंतर भट कुटुंबीय उत्सव स्थळापासून पायीच वाहनाकडे निघाले होते. मात्र वाटेतच अमोघचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे भट कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अमोघ जन्मापासून त्रास होता....
जळगावमधील शनिपेठ भागात राहणारे विवेक भट याना दोन मुले आहेत. त्यातील अमोघ नावाचा तीन वर्षांचा मुलगा हा जन्माला आल्या नंतर सहा महिन्यांचा झाला, तरी पायाने ताकद घेत नसल्याचं लक्षात आल्यावर, भट कुटुंबाने अनेक तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले. मात्र त्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. उपचार करूनही फरक पडत नसल्याने भट कुटुंबाने अध्यात्मिक बाबी साठी प्रयत्न केले. अशातच मध्यप्रदेशात असलेल्या सीहोर येथील रुद्राक्ष महोत्सवाची माहिती भट कुटुंबाला मिळाली.
रुद्राक्ष महोत्सवात पोहचल भट कुटुंबीय...
म्हणून भट कुटुंब आपल्या तीन वर्षांच्या अमोघसह सिहोर येथे रुद्राक्ष महोत्सवासाठी दाखल झाले. मात्र महोत्सवात प्रचंड गर्दी झाल्याने रुद्राक्ष वाटप बंद करण्यात आले. यामुळे भाविक रुद्राक्ष न घेताच घराची वाट धरत होते. याच सुमारास भट कुटुंबीयांनी देखील परतीची वाट धरली. मात्र गर्दीमुळे वाट काढत असताना आईच्या कडेवर असलेल्या तीन वर्षाच्या अमोघची प्रकृती ढासळली. यावेळी पिण्यास पाणी ही न मिळाल्याने आणि गर्दीचे धक्के खावे लागल्याने अमोघची प्रकृती गंभीर झाली. अमोघच्या कुटुंबियांनी पोलिसांची मदत घेत त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अमोघचा मृत्यु दुर्दैवी मृत्यू झाला.