नाशिक : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी नाशिक (Nashik) येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत असून महंत रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सुचनेनंतर रामगिरी महाराजांना थेट पोलीस संरक्षण (Police Protection) देण्यात आले आहे. 


सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नाशिकसह छत्रपती संभाजीनगरात तणाव निर्माण झाला होता. आता परिस्थिती नियंत्रणात असून शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. ज्या रामगिरी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांची शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. या सप्ताहात मंत्री गिरीश महाजन आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील हजेरी लावली.


रामगिरी महाराजांची सुरक्षा वाढवली 


आज नाशिक जिल्ह्यातील पांचाळे येथे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांची सुरक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनंतर वाढवण्यात आली आहे. रामगिरी महाराजांच्या सुरक्षेसाठी बंदूकधारी पोलिसांसह साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात आले आहेत. प्रवचनस्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


मुख्यमंत्र्यांकडून रामगिरी महाराजांचा संत म्हणून उल्लेख


दरम्यान, वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी महंत रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतरदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिन्नर येथील कार्यक्रमात हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांनी रामगिरी महाराजांचा उल्लेख 'संत' असा केला. तर मंत्री गिरीश महाजन यांनी रामगिरी महाराजांना वाकून नमस्कार केला. सुजय विखे पाटील यांनी रामगिरी महाराजांसमोर साष्टांग दंडवत घातल्याने चर्चांना उधाण आले आहे. 


वैजापूरमध्ये तणावपूर्ण शांतता


रामगिरी महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात तणाव निर्माण झाला होता. वैजापूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अचानक रात्री आठच्या दरम्यान जमाव जमा झाला त्यांनी घोषणाबाजी करत टायरही जाळले. या प्रकरणात वैजापूर पोलिसांनी रामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्यानंतर जमाव शांत झाला. यानंतर वैजापूर तालुक्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. 16 ऑगस्ट रात्री बारा वाजेपासून ते 19 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या वैजापूरमध्ये तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे.   


आणखी वाचा 


Vijay Wadettiwar : 'हे कसले संत, जबाबदार पदावर असताना मुख्यमंत्र्यांनी सांभाळून बोलावं'; विजय वडेट्टीवार कडाडले, भाजपवरही जोरदार हल्लाबोल