Vijay Wadettiwar : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वक्तव्य केले होते. या घटनेचे पडसाद छत्रपती संभाजीनगरसह राज्यात उमटत असून महंत रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सिन्नर येथे हरीनाम सप्ताहाला भेट दिली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चक्क रामगिरी महाराजांसोबत एकाच व्यासपीठावर बसले. तसेच मुख्यमंत्र्यांनी रामगिरी महाराजांचा संत म्हणून उल्लेख केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच नाशिकमध्ये (Nashik) काल दंगल सदृश्य परिस्थिती उद्भवली होती. यावरून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी जबाबदार पदावर असताना सांभाळून बोलावे
राज्यात होणारे दंगे हे सरकार पुरस्कृत आहे, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महंत रामगिरी महाराज यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, हे रामगिरी कसले संत, मुख्यमंत्र्यांनी जबाबदार पदावर असताना सांभाळून बोलावे. हे भाजपचे पोसलेले संत आहेत. हे भाजपचे चमकोगिरी संत आहेत. तेढ निर्माण करणाऱ्याला समर्थन असेल ही गंभीर बाब आहे. राज्यात दंगली घडवण्याची यांची मानसिकता असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
आशिष शेलार गुंडगिरीची भाषा करताय
नाशिकच्या दंगल सदृश्य परिस्थितीबाबत प्रतिक्रिया देताना भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी हिंदू मोर्चामुळे ज्यांचे पोट दुखत असेल त्यांच्या पाठी सोलून काढा, असे वक्तव्य केले होते. यावरुन विजय वडेट्टीवार यांनी आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला. आशिष शेलार राजकारणाची नाही तर गुंडगिरीची भाषा करत आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.
निवडणूक पुढे ढकलून राजकीय फायदा घ्यायचाय
2019 मध्ये हरियाणा आणि महाराष्ट्रात एकाच वेळी निवडणुका पार पडल्या होत्या. यंदा मात्र दोन्ही राज्यात वेगवेगळ्या निवडणुका पार पडणार आहे. दिवाळीआधी राज्यात निवडणुका पार पडतील असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आता दिवाळीनंतर निवडणुका पार पडतील, असे स्पष्ट संकेत निवडणूक आयोगानेच दिले आहेत. याबाबत विजय वडेट्टीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, विधानसभेसाठी महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका सोबत व्हायच्या. मात्र राज्य सरकारला निवडणूक पुढे ढकलून राजकीय फायदा घ्यायचा आहे. महायुतीला पोषक वातावरण नाही. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलत आहे. पण जनतेनं ठरवलं आहे की, या दरोडेखोरांना निवडून द्यायचं द्यायचं नाही. त्यामुळे जितकी निवडणूक पुढे जाणार तितके त्यांचं अधिक नुकसान होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा