Raj Thackeray नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आजपासून तीन दिवस नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. आज त्यांचे शहरात आगमन होणार आहे. यंदा मनसेचा १८ वा वर्धापन दिन सोहळा (MNS Vardhapan Din) नाशिकमध्ये होत आहे. यासाठी राज ठाकरे हे सलग तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या वर्धानपन दिनाची नाशकात जय्यत तयारी सुरु आहे. राज ठाकरे हे आज गुरुवारी सायंकाळी नाशिकमध्ये दाखल होतील. यावेळी त्यांचे पदाधिकाऱ्यांकडून जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. पक्षाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याच्या दृष्टीने या वर्धापन दिनाकडे पाहिले जात आहे.
राज ठाकरे काळाराम मंदिरात करणार महाआरती
आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्वभूमीवर निरुत्साह असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला जाणार आहे. उद्या सकाळी नऊ वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) जाऊन महाआरती करणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी नऊ वाजेला वर्धापन दिन कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
मनसेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन
नुकत्याच पुणे येथील दौऱ्यात पदाधिकारी उशिराने आल्याने राज ठाकरे यांनी थेट पुणे सोडल्याचे समोर आले होते. त्यामुळे असला प्रकार नाशिकमध्ये होऊ नये, याकरिता शहरातील पदाधिकारी कमालीची काळजी घेत आहेत. मनसेप्रमुख येण्यापूर्वीच पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मनसेकडून नाशिकमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते नाशिकमध्ये दाखल होणार आहेत.
लढायचं ते जिंकण्यासाठीच..
राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्धापन दिन होत असल्याने यानिमित्ताने पक्षाकडून शहर भगवेमय केले आहे. शहरातील महत्त्वाचे चौक मनसेच्या ध्वजाने सजविण्यात आले आहेत. तसेच 'लढायचं ते जिंकण्यासाठीच.. अशा मजकुराचे होर्डिंग्स शहरात लावण्यात आल्याने ते सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. राज ठाकरे संबोधित करणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीचे रणशिंग मनसे नाशिकमधून फुंकणार आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात मनसे कुठल्या उमेदवाराला संधी देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या