नाशिक : महायुती सरकारने (Mahayuti Government) यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) घोषणा केली. या योजनेत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची मदत दिली जात आहे. 14 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सरकारने सुरुवात केली आहे. अनेक महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये जमा झाले आहेत. मात्र या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
प्रकाश आंबेडकर सोमवारी नाशिक दौऱ्यावर आले होते. नशिकमध्ये माजी आमदार जे पी गावित (J P Gavit) हे पेसा भरती व्हावी, यासाठी आदिवासी विकास भवन कार्यालयात गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणाला (Hunger Strike) बसले आहेत. आज प्रकाश आंबेडकर यांनी जे पी गावित यांच्या आंदोलन स्थळी भेट दिली.
लाडकी बहीण योजनेला पैसा कुठून आला?
यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आदिवासी 7.5 टक्के आहे. दहा हजार कोटीचे बजेट आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ठेवले पाहिजे. दुर्दैवाने सरकारला अदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जाणीव नाही. बोगस आदिवासी भरती आहेत, असे विधानसभात सांगितले. जे बोगस होते त्यांना खुल्या प्रवर्गात समाविष्ट केले. पण आदिवासी पेसाअंतर्गत भरती केली नाही. नाशिकचे आदिवासी आयुक्तालय आंदोलनासाठी लक्ष करण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयावर लक्ष करा, असे त्यांनी यावेळी म्हटले. तर लाडकी बहीण योजनेला पैसा कुठून आला? आदिवासींच्या बजेटचे 7 हजार कोटी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केले का? जर असे नाही तर सरकारने आदिवासींच्या बजेटच्या विवरण द्यावे, असे त्यांनी यावेळी म्हटले.
प्रकाश आंबेडकरांची जे पी गावितांनी मोठी ऑफर
तसेच जे पी गावीत यांनी आमच्यासोबत तिसऱ्या आघडीत यावे, अशी ऑफर प्रकाश आंबेडकर यांनी जे पी गावित यांना दिली आहे. माकपने काँग्रेसशी लग्न केले आहे, त्यांचा काडीमोड झाल्यावर बघू, असेही त्यांनी यावेळी म्हटले. आता जे पी गावित नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा