नागपूर: आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा आणि कुणबी समाजाचे आमदार जास्त संख्येने निवडून आले तर ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण होईल, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले. तसेच मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे, या मागणीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्यक्ष पाठिंबा आहे. त्यासाठी शरद पवार हेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठबळ देत आहेत, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना याबाबत भाष्य केले.


यावेळी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांना लक्ष्य केले. ज्या अर्थी शरद पवार (Sharad Pawar) हे आरक्षणासंदर्भातील बैठकीत येत नाही, मराठा आरक्षणाबद्दल स्वतःचं मतही मांडत नाहीत. याचा सरळ अर्थ हाच आहे की, शरद पवार हेच मनोज जरांगे यांच्या पाठीशी आहेत. त्यांचा जरांगे पाटील यांना पाठिंबा आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या, जरांगे पाटलांच्या या मागणीलाही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्यक्ष पाठिंबा आहे. तर काँग्रेस या मुद्द्यावर मौन बाळगून आहे, असेही आंबेडकर म्हणाले.


विधानसभेत मराठा-कुणबी आमदारांचे वर्चस्व निर्माण झाले तर... प्रकाश आंबेडकरांचा धोक्याचा इशारा


प्रकाश आंबेडकर यांनी एक नवीन थिअरी मांडली आहे. त्यांनी म्हटले की, राज्यातील आगामी निवडणुकीनंतर विधानसभा सभागृहात मराठा आणि कुणबी आमदारांचे संख्यात्मक वर्चस्व विधानसभेत निर्माण झाले, तर नियोजनबद्ध पद्धतीने ओबीसींच्या जातनिहाय गणनेची मागणी मान्य करत जोवर गणना पूर्ण होत नाही, तोवर ओबीसी आरक्षण स्थगित ठेवले जाईल आणि ओबीसींना आरक्षणापासून वंचित केले जाईल. हे टाळायचे असल्यास ओबीसींचे (कुणबी व्यतिरिक्त इतर ओबीसी जातींचे) किमान शंभर आमदार निवडून येणे आवश्यक असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.


भाजपही ओबीसी समाजाचा शत्रू असून एकही भाजप नेता आम्ही ओबीसी आरक्षणाच्या बाजूने आहोत आणि मनोज जरांगेच्या विरोधात आहोत, असे मत स्पष्टरित्या मांडत नाही. त्यामुळे जोवर एखादा पक्ष ओबीसी आरक्षणाला पूर्ण पाठिंबा देत नाही, तोवर ओबीसींनीही त्या पक्षाला पाठिंबा देऊ नये, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला.   लोकसभा निवडणुकीत 31 मराठा आणि कुणबी मराठा खासदार निवडून आले. या सर्वांनी मनोज जरांगे यांच्याशी बांधिलकी व्यक्त केली. हे ओबीसींनी लक्षात ठेवले पाहिजे.


कुणबी समाज मराठ्यांच्या बाजूने झुकेल हे फक्त मी म्हणत नाही, तर आता असे उर्वरित ओबीसींना वाटू लागले आहे. त्यामुळे कुणबी समाजानेच आता उर्वरित ओबीसींना आश्वस्त करणे आवश्यक आहे. त्यांनीच आम्ही मराठ्यांबरोबर जाणार नाही, हे उर्वरित ओबीसींना सांगणे गरजेचे आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.


आणखी वाचा


ओबीसी आरक्षणात मराठ्यांचा समावेश होणे शक्य नाही, मनोज जरांगेच्या सगेसोयरेच्या मागणीलाही माझा विरोध : प्रकाश आंबेडकर