नाशिक : माजी आमदार जे पी गावित (J P Gavit) हे पेसा भरती व्हावी, यासाठी आदिवासी विकास भवन कार्यालयात गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणाला (Hunger Strike) बसले आहेत. आज आंदोलन स्थळावरून त्यांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. 28 तारखेपर्यंत आंदोलनाची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जे पी गावित यांनी दिला आहे. 


जे पी गावित म्हणाले की, येत्या 28 तारखेला राज्यातील सर्व आदिवासी पात्र उमेदवार नाशिकमध्ये (Nashik) येणार आहेत. आम्ही 28 तारखेला आंदोलनाची भूमिका घेणार आहोत. 28 तारखेपर्यंत आंदोलनाची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. पेसाअंतर्गत भरतीबाबत निर्णय झाला नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दारी देखील धडकणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 


प्रकाश आंबेडकरांची जे पी गावितांना मोठी ऑफर 


दरम्यान, आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जे पी गावित यांची आंदोलनस्थळी भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आदिवासी 7.5 टक्के आहे. हे टक्के पकडले तर 70 हजार कोटी होते. दहा हजार कोटी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ठेवले पाहिजे. दुर्दैवाने सरकारला अदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जाणीव नाही. बोगस आदिवासी भरती आहेत, असे विधानसभात सांगितले. जे बोगस होते त्यांना खुल्या प्रवर्गात समाविष्ट केले. पण आदिवासी पेसाअंतर्गत भरती केली नाही. नाशिकचे आदिवासी आयुक्तालय आंदोलनासाठी लक्ष करण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयावर लक्ष करा, असे त्यांनी यावेळी म्हटले. तसेच जे पी गावीत यांनी आमच्यासोबत तिसऱ्या आघडीत यावे, अशी ऑफर प्रकाश आंबेडकर यांनी जे पी गावित यांना दिली आहे. माकपने काँग्रेसशी लग्न केले आहे, त्यांचा काडीमोड झाल्यावर बघू, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 


...तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार


रविवारी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जे पी गावित यांची आंदोलनस्थळी भेट घेतली. नरहरी झिरवाळ यांची देखील प्रकृती ठीक नसल्याने गेल्या काही दिवसांपासून खाजगी रुग्णाला उपचार घेत आहेत. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच रात्री नरहरी झिरवाळ हे जेपी गावित यांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी जे पी गावित यांच्याबरोबर चर्चा केली. त्यात रिझर्वेशनमध्ये निवडून आलेले 25 आमदार आणि दोन खुल्या वर्गात निवडून आलेले 2 आमदार, अशा एकूण 27 आमदारांना येत्या दोन दिवसात आदिवासी विकास भवन कार्यालयात बोलवणार असल्याचे नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. या भरतीसाठी आपण सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्र्यांना इकडेच बोलावू किंवा मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करून हा विषय मार्गी लावू, असे आश्वासन नरहरी झिरवाळ यांनी जे पी गावित यांना दिले. तर पेसा कायदा आणि पेसा भरतीबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी प्रतिक्रिया गावित यांनी दिली आहे. जेपी गावित यांची प्रकृती देखील ठीक नसल्यानं उपोषणाच्या ठिकाणी डॉक्टर चेकअप सुरू आहे. 


आणखी वाचा 


Prakash Ambedkar: विधानसभेत मराठा-कुणबी आमदारांचे वर्चस्व निर्माण झाल्यास ओबीसी आरक्षणाला स्थगिती, प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर गंभीर आरोप