पुणे: गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुण्याला चांगलेच झोडपले आहे. सोमवारीही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने पुण्यात आज ऑरेंज अलर्ट आणि घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. घाटमथ्यावरील अतिवृष्टीने पुणेकरांची धडधड वाढली  आहे. 



खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आला आहे. रविवारी रात्री उशिरा 31 हजार क्युसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग मुठा नदीपत्रात करण्यात आला. त्यामुळेच शहरातील नदीकाठचा रस्ता जलमय झाला असून हा रस्ता गेल्या दोन दिवसापासून वाहतुकीसाठी बंद आहे. आजही पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


पुण्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे पुणे पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. शहरातील  41 बाधित ठिकाणांवर डोळ्यात तेल घालून लक्ष आपत्कालीन टीम तैनात ठेवण्यात आल्या आहेत. 


41 बाधिक भागात आरोग्य विभाग, घनकचरा विभाग, व्यवस्थापन विभाग अशा अनेक पथकांना महापालिकेकडून सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बाधिक ठिकाणांजवळील शाळा आणि हॉल नागरिकांच्या सोयीसाठी तयार ठेवले आहेत. याशिवाय, महानगरपालिकेने नागरिकांच्या मदतीसाठी नंबर जारी केला आहे. आपातकालीन  परिस्थितीत 020-25501269,020-25506800  या दोन नंबरवर नागरिकांना संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आले आहे. एकता नगर, भिडे पूल, शिवणे पूल, पाटील इस्टेट झोपडपट्टी, पुलाची वाडी, ओंकारेश्वर मंदिर, भिडे पूल, शिवणे पूल या परिसरात यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. 


नाशिकमध्ये गोदावरीची पूरस्थिती कायम


नाशिकच्या गोदावरीची पूरस्थिती कायम आहे. शहारासह जिल्हाभरात पावसाचा जोर कायम असल्यानं धारणामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणांतून दोन दिवसांपासून 8 हजार  428 क्यूसेक वेगाने गोदावरी नदीत विसर्ग सुरू आहे. गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गोदा काठावरील मंदिर आजही पाण्याखाली आहेत.  सलग तीन दिवसापासून पूर असल्यानं गोदा काठावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी पाऊस असल्यानं 14 धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदी काठच्या गावांना  सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम 


कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. पंचगंगेची पाणीपातळी 26 फूट पाच इंचावर  पोहोचली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. 


आणखी वाचा


पुलावरुन मित्राला फोन लावला अन् जीवन संपवणार म्हणत महिला पोलिसाची थेट इंद्रायणी नदीत उडी