Nashik News नाशिक : अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) नाशिकमध्ये (Nashik News) मोठी कारवाई केली आहे. घोटी (Ghoti) येथे छापा टाकून सुमारे साडे चार लाखांचा पॅकेज्ड ड्रिंकिग वॉटरचा (Packaged Drinking Water) साठा जप्त करण्यात आला आहे. 


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाने घोटी येथे मे. साईमेवा फुड अ‍ॅण्ड बेव्हरजेसवर (Saimeva Food and Beverages) छापा टाकला. या ठिकाणी कमी दर्जा, असुरक्षित पॅकेज्ड ड्रिंकिग वॉटरचा साठा असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. 


नेमका प्रकार काय?


अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक कार्यालयाला घोटी येथील मे. साईमेवा फुड अ‍ॅण्ड बेव्हरजेसमध्ये असुरक्षित पॅकेज्ड ड्रिंकिग वॉटरचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी छापा (Raid) टाकला. 


साडेचार लाखांचा साठा जप्त


छाप्यात त्या ठिकाणी विना बीआयएस प्रमाणपत्र तसेच आक्षेपार्ह लेबल असलेले, दोषयुक्त पॅकेज्ड ड्रिंकिग वॉटरचा साठा आढळून आला आहे. 4 लाख 26 हजार 488 रुपये किमतीच्या एक लिटरच्या 21 हजार 324 पॅक बॉटल्स, 19 हजार 110 रुपये किमतीचे छापलेले 26 रोल लेबल्स, असा एकूण चार लाख 45 हजार 598 रुपये किमतीचा साठा अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. 


तसेच या ठिकाणाहून नमुने घेण्यात आले आहेत. विश्लेषणासाठी ते विश्लेषकांकडे पाठविण्यात आले आहेत. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार आहे. सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे, गोपाल कासार यांनी संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.


खातरजमा करुनच व्यवसाय करा


नाशिक (Nashik News) विभागातील सर्व पॅकेज्ड ड्रिंकिग वॉटरच्या उत्पादकांनी त्यांच्या त्यांचे स्थापित उत्पादन क्षमतेनुसारच राज्य, केंद्र अन्न परवाना असल्याची तसेच विधीग्राह्य बीआयएस प्रमाणपत्र असल्याची खातरजमा करुनच व्यवसाय करण्याचे आवाहन नाशिक विभागाचे सह आयुक्त सं.भा. नारागुडे, यांनी केले आहे. ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) उ. सि. लोहकरे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल कासार यांच्या पथकाने केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Nashik Crime News : नाशिक-मुंबई महामार्गावर सशस्त्र दरोडा; डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटला कोट्यवधींचा ऐवज


पिल्लू तुला दोन मिनिट त्रास होईल, पण दुसऱ्या जन्मात नक्की भेटू… आधी प्रेयसिला संपवलं नंतर स्वत:ही जीव दिला