Nashik Crime News नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गावर (Nashik-Mumbai Highway) सशस्त्र दरोड्याचा (Robbery) प्रकार घडला आहे. डोळ्यात मिरचीची पूड टाकून तब्बल तीन कोटींचा ऐवज दरोडेखोरांनी लुटल्याची माहिती मिळत आहे. गुरुवारी पहाटे ही घटना घडली आहे. 


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक- मुंबई महामार्गावरून गुरुवारी पहाटे सोनं आणि चांदीचे दागिने (Gold and silver Jewellery) घेऊन जाणारी एक कुरिअर सर्व्हिसची इको जात होती. यावेळी 4 ते 5 अज्ञात व्यक्तींनी फिल्मी स्टाईलने माणिकखांब जवळ गाडीच्या पुढे आणि मागे गाडी आडवी लावली. त्यानंतर गाडीतील व्यक्तींना शस्त्राचा धाक दाखवला.


सोने-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला


दरोडेखोरांनी इको गाडीतील चालक आणि त्याच्या सहकाऱ्याला गाडीबाहेर खेचले आणि त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. त्यानंतर गाडीतील साडेतीन किलो सोन आणि चांदीचे दागिन्यांवर चोरांनी डल्ला मारला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 


3 कोटी 67 लाख 50 हजारांचा ऐवज लंपास


यात 66 लाख रुपये किमतीचे 1 किलो 100 ग्राम वजनाचे 11 बिस्कीट,  20 लाख 40 हजार रुपये किमतीचे 3 किलो 400 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 65 लाख रुपयांचे प्रत्येकी 30 किलो वजनाच्या 3 चांदीच्या विटा, 32 लाख 50 हजार रुपयांचे 45 किलो वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 3 कोटी 67 लाख 50 हजार रुपये किमतीचे ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला आहे. माणिकखांब ते मुंडेगाव दरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 


चार राज्यात गुन्ह्याची असणारी टोळी जेरबंद


चार राज्यात दरोडा, खुनाने दहशत माजवणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा कक्ष-3 च्या युनिटला गेल्या काही दिवसांपूर्वी मोठं यश मिळालं होतं. ही टोळी वसईतील महामार्गाजवळील एक पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीत होती. मात्र, गुन्हे शाखेच्या युनिट-3 च्या पथकाने यशस्वीरित्या सहा जणांना अटक केली. या टोळीत एक महिलाही आहे. या टोळीतील काहींवर मध्य प्रदेशात पाच हजार इनाम देखील होता. दरोडा आणि हत्येसारखे गंभीर गुन्हे या टोळीवर आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या


Nashik News : "एक रावण को श्रीराम ने मारा, हुकूमशाही के रावण को हम सब मारेंगे"; नाशिकमध्ये ठाकरे-शिंदे गटात होर्डिंग वॉर


Dhule Loksabha Election : मागील तीन टर्ममध्ये काँग्रेसला यश नाही; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा धुळे लोकसभेवर दावा, तयारीलाही सुरुवात