NMC Pushpotsav : नाशिक महानगरपालिकेचा (Nashik NMC) बहुचर्चित पुष्पोत्सव (Pushpotsav 2025) रद्द करण्यात आला आहे. सात फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी या तीन दिवसांसाठी महापालिका मुख्यालयात पुष्पोत्सव आयोजित करण्यात आला होता. मात्र, या पुष्पोत्सवावर महापालिका आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) फुली मारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरवर्षी नाशिककर महापालिकेच्या पुष्पोत्सवाची वाट पाहतात, यंदाही महापालिका मुख्यालयात पुष्पोत्सवाची तयारी मोठ्या जोमाने सुरू करण्यात आली होती. जवळपास 50 टक्क्यांपेक्षा अधिक काम या पुष्पोत्सवाचे झाले होते. उद्यान विभागाकडून या पुष्पोत्सवासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते. यंदा मराठी तसेच हास्य कलाकारांची मांदियाळी देखील नाशिककरांना पाहायला मिळणार होती.
नेमकं कारण काय?
यंदाच्या पुष्पोत्सवासाठी आयुक्त खत्री यांनी 47 लाख 37 हजार रूपयांच्या खर्चाला मान्यता दिल्याने दि. 7 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत पुष्पोत्सव घेण्याचे निश्चित झाले होते. त्यासाठी महापालिकेमध्ये काम देखील सुरू करण्यात आले होते. मात्र, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी खर्चाची बचत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याने पुष्पोत्सवावर 47 लाख रुपये खर्च करण्याची बाब उचित नसल्याचे कारण देत आयुक्त खत्री यांनी आता आपल्या अधिकारात ऐनवेळी पुष्पोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन दोन दिवसावर येऊन ठेपलेला पुष्पोत्सव महापालिका आयुक्तांनी रद्द केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी सूक्ष्म नियोजनावर भर
दरम्यान, प्रयागराजच्या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेगिरीनंतर राज्य सरकार सावध पावले उचलत असून नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.गृह सचिव, पालक सचिव यांच्या पाठोपाठ आता विभागीय आयुक्त स्तरावर बैठकांचा धडका सुरु असून सूक्ष्म नियोजनावर भर दिला जात आहे. गर्दीचा ओघ वाढल्याने लाकडी बॅरिकेट तुटून जातात, त्यामुळे नाशिकच्या कुंभेळ्यात स्टीलचे बॅरिकेट्स बसविणे, साधुग्रामसाठी अधिक जागा उपलब्ध करून देणे शाही स्नानाचे ठिकाण, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही बसविणे अतिरिक्त कुमक किती लागणार? त्यांचे फिक्स पॉईंट कुठे केले जाणार? बंदोबस्ताचे स्वरूप कसे असणार? गर्दीचे नियंत्रण कसे ठेवले जाणार? यासंदर्भात रूपरेषा ठरविली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या