Guillain Barre Syndrome : राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) या आजाराने थैमान घातले आहे. राज्यात एकूण गुलेन बॅरी सिंड्रोमची रुग्णसंख्या 140 वर पोहचली आहे. यापैकी 78 रुग्ण हे पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. तर 26 रुग्ण पुणे महापालिका, 15 पिंपरी-चिंचवड महापालिका, 10 रुग्ण पुणे ग्रामीणमधील आहेत. तर इतर जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या 11 आहे. एकूण रुग्णांपैकी 45 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून 18 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत 25 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेचा (Nashik NMC) वैद्यकीय विभाग सतर्क झाला असून महापालिकेच्या दोन रुग्णालयात विशेष कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.


अतिदक्षतेचा उपाय म्हणून महापालिकेने या आजाराच्या संशयितांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना केलीय. महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाचे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय आणि हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (बिटको) रुग्णालय या ठिकाणी करण्यात आले आहेत. महापालिका हद्दीत खाजगी रुग्णालयात अशा पद्धतीचे रुग्ण आढळल्यास महापालिकेला कळवण्याचे आव्हान देखील मनपाच्या वैद्यकीय विभागाने केले आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात अद्याप गुलेन बॅरी सिंड्रोमचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, या आजाराच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.  


'जीबीएस' आजार नेमका काय? 


गुलेन बॅरी सिंड्रोममध्ये बाहेरील विषाणू किंवा जिवाणूंवर हल्ला करणारी शरीरातील रोगप्रतिकारशक्तीच मज्जासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे मेंदूकडून शरीरातील इतर अवयवांना मिळणारे संकेत कमी होतात, असे या आजाराचे स्वरूप आहे. स्नायू कमकुवत होऊ शकतात. हाता-पायातील संवेदना कमी होऊ शकते. गिळताना किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. प्रौढांमध्ये आणि पुरुषांमध्ये ही समस्या अधिक असून, सर्वच वयोगटांतील लोकांना याचा त्रास होऊ शकतो. 


'जीबीएस'ची लक्षणे काय?



  • बरा न होणारा ताप, सर्दी, खोकला,

  • सातत्याने अशक्तपणा,

  • हात, पाय, चेहऱ्यावरील स्नायूंना अर्धांगवायूचा झटका येणे, 

  • छातीमध्ये प्रादुर्भाव होऊन श्वास घेण्यास त्रास होणे, 

  • बोलण्यासह अन्न गिळण्याचा त्रास होणे, 

  • रक्तसंसर्ग होऊन फुफ्फुसात गुठळ्या अन् हृदयविकाराचा झटका येणे, 

  • न्यूरोलॉजिकल गुंतागुंतीत वाढ, 

  • जास्त दिवस डायरियाचा त्रास होणे, 


काळजी कशी घ्याल? 



  • अन्न स्वच्छ आणि ताजे खावे. 

  • पिण्याचे पाणी उकळून प्यावे.  

  • वैयक्तिक स्वच्छता करावी. 

  • लक्षणे दिसू लागताच 7 ते 14 दिवसांमध्ये उपचार घ्यावेत.


आणखी वाचा 


एकाच दिवसांत GBS चे 10 रुग्ण वाढले, पुणेकरांची चिंता वाढली; 18 पेशंट व्हेंटिलेटरवर