Nashik Kumbh Mela : प्रयागराजमध्ये (Prayagraj) सुरु असलेल्या कुंभमेळ्यात (Kumbh Mela 2025) चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू तर 60 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रयागराजच्या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर राज्य सरकार (Maharashtra Government) सावध पावले उचलत असून नाशिकमध्ये (Nashik News) होणाऱ्या कुंभमेळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.
गृह सचिव, पालक सचिव यांच्या पाठोपाठ आता विभागीय आयुक्त स्तरावर बैठकांचा धडका सुरु असून सूक्ष्म नियोजनावर भर दिला जातोय. गर्दीचा ओघ वाढल्याने लाकडी बॅरिकेट तुटून जातात, त्यामुळे नाशिकच्या कुंभमेळ्यात स्टीलचे बॅरिकेट्स बसविणे, साधुग्रामसाठी अधिक जागा उपलब्ध करून देणे शाही स्नानाचे ठिकाण, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही बसविणे अतिरिक्त कुमक किती लागणार? त्यांचे फिक्स पॉईंट कुठे केले जाणार? बंदोबस्ताचे स्वरूप कसे असणार? गर्दीचे नियंत्रण कसे ठेवले जाणार? यासंदर्भात रूपरेषा ठरविली जात आहे.
अधिकारी प्रयागराजच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार
प्रयागराज मधील दुर्घटनेनंतर महाराष्ट्रातील प्रमुख अधिकारी प्रयागराजच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान हा दौरा असणार आहे. तिथल्या कुंभमेळ्याचे नियोजन कसे होते? नियोजनात कुठे चूक झाली? याचा अभ्यास केला जाणार आहे. त्याचबरोबर नाशिकमधील कुंभेमेळ्यासाठी कामांना सुरुवात केली जाणार आहे. ज्या कामाला दोन वर्ष लागणार आहेत त्याचा आढावा घेतला जात आहे.
शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न
भूसंपादनाचा विषय त्वरित सोडावा लागणार असून त्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय काम आणि इतर कारणासाठी काही इमारती लागणार आहे त्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. काही अधिकारी, कर्मचारी, अभियंत्यांची कुंभमेळ्याच्या काळात गरज भासणार असून या अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे. तसेच, गर्दीचे नियोजन, बेरिगेटिंग, वाहनतळ, साधूग्रामाचे क्षेत्र वाढवणे यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. गर्दीच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही कंट्रोल रूमच्या माध्यमातून पोलीस विभाग आणि अग्निशमन विभाग लक्ष ठेऊन आहे. गोदावरी संवर्धन करून कुंभमेळ्याला शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या