नाशिक : राज्य सरकारच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात मेगा भरतीची घोषणा करण्यात आली आणि त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामध्ये 20 संवर्गातील तब्बल 1038 पदांची भरती प्रक्रिया पार पडत असून जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या 1038 जागांसाठी तब्बल 64,080 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर तब्बल पाच कोटी रुपयांचं चलन जमा झाले आहे.


नाशिक जिल्हा परिषदेच्या 20 संवर्गातील तब्बल 1038 पदांची भरती प्रक्रिया पार पडणार असून यासंदर्भातील जाहिरात ही 5 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यांनतर अर्ज भरण्यास सुरवात झाली होती. जवळपास 20 दिवसांत अर्ज भरण्याच्या मुदतीत 64 हजार 80 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर यासाठी 900 रुपयांचे चलन होते, त्यानुसार जवळपास 5 कोटी 75 लाख 43 हजार 100 रुपयांचे चलन जमा झाले आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.


जिल्हा परिषदेकडून विद्यार्थ्यांना आवाहन


सदर परीक्षेची संपूर्ण भरती प्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाज विघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून प्रलोभन दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी अशा फसवणुकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी, तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, अन्यथा अशी फसवणूक झाल्यास शासन अथवा जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही. अशा प्रकारे कोणतीही व्यक्ती परीक्षेसंदर्भात आर्थिक मागणी करीत असल्याबाबत निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात यावी, असे सर्व आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.


कुठल्या पदासाठी किती अर्ज - 


दरम्यान नाशिक जिल्हा परिषदेसाठी 1038 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यात अनेक पदांचा उल्लेख आहे. आता अर्ज प्रक्रिया संपुष्टात आली असून जिल्हा परिषदेच्या माहितीनुसार (कंत्राटी) ग्रामसेवक पदाच्या 50  जागांसाठी 11 हजार 728 अर्ज दाखल झाले आहेत. आरोग्य पर्यवेक्षकच्या 3 जागांसाठी  91 अर्ज, आरोग्य परिचारिका [आरोग्य सेवक (महिला)साठी 597 जागांसाठी, 3954 अर्ज, आरोग्य सेवक (पुरुष) 85 जागांसाठी 17 हजार 579 अर्ज, आरोग्य सेवक (पुरुष) 126 जागांसाठी, 6488 अर्ज, औषध निर्माण अधिकारी 20 पदासाठी  5057 अर्ज, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 14 जागांसाठी  2607 अर्ज, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 2 जागांसाठी 337 अर्ज, विस्तार अधिकारी(शिक्षण) (वर्ग 3 श्रेणी 2) 7 जागांसाठी 1047 अर्ज, वरिष्ठ सहाय्यकच्या 3 जागांसाठी  1773 अर्ज, पशुधन पर्यवेक्षकच्या 28 जागांसाठी 774 अर्ज, कनिष्ठ आरेखकच्या 2  जागांसाठी 41 अर्ज,  कनिष्ठ लेखा अधिकारी 1 जागेसाठी 48 अर्ज, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) 5- जागांसाठी 863 अर्ज, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) 22 जागांसाठी 2667 अर्ज,  मुख्य सेवीका / पर्यवेक्षिका 4 जागांसाठी 677 अर्ज, कनिष्ठ यांत्रिकी 1 जागा, 44 अर्ज, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)  इवद/ग्रा.पा पु. 34 जागा, 5268 अर्ज, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (स्थापत्य ) इवद/ग्रा.पा पु.  33 जागांसाठी  2942 अर्ज संख्या लघुलेखक (उच्च श्रेणी) 1 जागेसाठी  95 अर्ज दाखल झाले आहेत.एकूणच नाशिक जिल्हा परिषदेच्या 1038 जागांसाठी 64 हजार 80 अर्ज दाखल आले आहेत.


ही बातमी वाचा: