नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) पार पडलेल्या तलाठी परीक्षेत हायटेक कॉपी केल्याप्रकरणी गणेश गुसिंगेला (Ganesh Gusinge) अटक झालेली होती. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ माजली आणि ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा म्हसरूळ परिसरातील एका महाविद्यालयात काल दुपारी तलाठी परीक्षेचा पेपर सुरू असताना एका विद्यार्थिनीकडे इलेक्ट्रॉनिक उपकरण आढळून आल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे यानंतर कोणतीही कारवाई न करता विद्यार्थिनीला सोडून देण्यात आल्याचा आरोप इतर विद्यार्थ्यांनी केला आहे. 


नाशिक (Nashik Talathi Exam) शहरातील म्हसरूळमध्ये गेल्या महिन्यात तलाठी पेपर फुटीचे (Hightech Copy) प्रकरण ताजे असतानाच मंगळवारी पुन्हा म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील नामांकित शैक्षणिक संस्थेत पेपर फुटीचा प्रकार उघडकीस आला आहे. परीक्षा केंद्रात एका परीक्षार्थी तरुणीकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस असल्याचा प्रकार परीक्षार्थीमुळे उघडकीस आला आहे. संबंधित विद्यार्थिनींकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आढळल्याने विद्यार्थिनीला वर्गाबाहेर काढण्यात आलं. मात्र या विद्यार्थिनीवर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता तिला सोडलं गेलं, असा आरोप इतर विद्यार्थ्यांनी केला या प्रकरणाची पोलीस चौकशी केली जावी अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे. या संपूर्ण प्रकारानंतर परीक्षार्थींनी संताप व्यक्त करत महाविद्यालय प्रशासन तसेच पोलिसांच्या कारभारावर संशय व्यक्त करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 


महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण 4,344 पदांच्या भरतीसाठी राज्यभरातील 36 जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या. गेल्या महिन्यात दिंडोरी रोडवरील रिलायंस पेट्रोल पंपाजवळील वेबईजी परिक्षा केंद्रात पहिल्या टण्यातील तलाठी भरतीची (Talathi Exam) परीक्षा केंद्राबाहेरून एका संशयितास वॉकी टॉकी, हेडफोन, टॅब मोबाईलसह सुक्ष्म श्रवणयंत्र ताब्यात घेतले होते. हे प्रकरण ताजे असतानाच मंगळवार रोजी दिंडोरी रोडवरील रिलायन्स पंपामागील एका नामांकित शैक्षणिक संकुलात दुपारी तीन ते पाच वाजेच्या दरम्यान तलाठी पेपर सुरू होता. या संकुलातील ब्लॉक न. 101 क्रमांकामध्ये परीक्षा संपण्याच्या शेवटचा अर्धा तास बाकी असताना महिला पर्यवेक्षिका यांना एका परीक्षार्थी मुलीकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सापडले. यावेळी संबंधित महिला पर्यवेक्षिका यांनी इतर ब्लॉक मधील सहकारी पर्यवक्षकांना बोलावून घेत ते जप्त केले. त्यानंतर संबधीत परीक्षार्थी मुलीस बाहेर काढण्यात आल्याचे समोर आले. 


नेमक काय घडलं परीक्षा गृहात? 


तलाठी परीक्षा सुरू असताना एका विद्यार्थिनीकडे इलेक्ट्रॉनिक डिवाइस सापडले. परीक्षेची काही मिनिटे शिल्लक असताना ही बाब परीक्षा पर्यवेक्षकांच्या लक्षात आली, पर्यवेक्षकांनी तातडीने विद्यार्थिनींकडून ते उपकरण काढून घेण्यात आलं. संबंधित विद्यार्थिनीला परीक्षा हॉल बाहेर पाठवण्यात आलं, ती मुलगी पुन्हा परीक्षेला आली नाही, मात्र एवढं सगळं होऊनही संबंधित विद्यार्थिनींवर कुठलीही कारवाई झाली नाही, असा आरोप इतर विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच वर्षानुवर्ष मेहनत घेऊन परीक्षा देत असतात, मात्र असे गैरप्रकार होत असल्याने प्रामाणिक विद्यार्थ्यांची निराशा होत आहे याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.


इतर महत्वाची बातमी : 


Nashik News : तलाठीनंतर आता वनविभागाची परीक्षाही वादात? संशयित गुसिंगेकडे वनविभागाच्याही प्रश्नपत्रिका सापडल्या!