नाशिक : पावसाळा सुरू होऊन दीड महिने संपत आले तरी अद्यापही नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Rain) पडत नसल्याने परिस्थिती चिंताजनक होत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात फक्त दोन टक्के पाणीसाठ्यात (Nashik Water Storage) वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम आहे. 


जिल्ह्यात एकूण छोटे मोठे 22 धरण आहेत. सध्या या धरणांमध्ये फक्त नऊ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळ्यापूर्वी सात टक्के पाणीसाठा या धरणांमध्ये होता. पावसाळा सुरू झाल्यानंतर केवळ दोन टक्केच पाणीसाठ्यात वाढ झाल्याची परिस्थिती आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) देखील फक्त 22 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काळात मुसळधार पाऊस न झाल्यास परिस्थिती चिंताजनक होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस बरसत आहे. मात्र नाशिककरांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.   


जिल्ह्याच्या धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे


गंगापूर धरण समूहातील गंगापूर धरणात 22.58 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर कश्यपी धरणात 5.72 टक्के, आळंदीमध्ये 1.96, गौतमी गोदावरीमध्ये 10.97 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पालखेड धरण समूहातील पालखेडमध्ये 14.85 टक्के, करंजवणमध्ये 1.81 टक्के वाघाडमध्ये 2.87 टक्के तर भावली धरणात 17.78, मुकणे 3 टक्के, वालदेवी धरणात 5.21 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. दारणा धरणात 34.66 टक्के, भावलीमध्ये 30.68 टक्के, मुकणेमध्ये 45.72 टक्के, वालदेवीमध्ये 19.15 टक्के पाणीसाठा शिल्लक शिल्लक आहे. 


मागील वर्षाच्या तुलनेत पाणीसाठ्यात 17.51 टक्क्यांनी घट


नाशिक जिल्ह्यात एकूण 9 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी 5 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा 26.51 टक्के होता. मागील वर्षाच्या तुलनेत नाशिकचा पाणीसाठा तब्बल 17.51 टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे काही दिवसात नाशिकमध्ये जोरदार पाऊस बरसला नाही तर नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


नाशिक जिल्ह्यात फळबागा आणि भाजीपाल्याला फटका


दरम्यान, नाशिक जिल्ह्यात पाऊस वेळेत नसल्यामुळे आणि पावसाळ्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. खराब वातावरणामुळं फळबागांना आणि भाजीपाल्याला रोगराईचा फटका बसत आहे. सध्या पिकांचं उत्पादन कमी झाल्यामुळं दरात वाढ होताना दिसत आहे. टोमॅटोची दर प्रति किलो 80 ते 100 रुपये किलो दराने वाढला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


आज राज्यात पडणार मुसळधार पाऊस, बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज


नाशकात पाणी टंचाईच्या तीव्र झळा, मनमाडला महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा, पेठला दोन हंड्यांसाठी दीड किमीची पायपीट