नाशिक : गंगापूर धरण (Gangapur Dam) परिसरात असलेल्या गोदापात्रात काल मध्यरात्री एक चारचाकी वाहन थेट पुलावरून नदीत कोसळून भीषण अपघात घडला आहे. मागील पंधरा दिवसातील हा तिसरा अपघात (Nashik Accident News) असून या अपघातामध्ये चारचाकी वाहनात असलेल्या तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या गंमत जंमत हॉटेलजवळ काल मध्यरात्री एका कारचा भीषण अपघात झाला. कार थेट पुलाचे कठडे तोडून गोदावरी नदीपात्रात कोसळली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी नाशिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रात्रीच्या वेळी गंभीर अपघाताच्या घटना
दरम्यान, ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून गंगापूर धरण, कशप्पी धरण या ठिकाणी अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. रात्रीच्या वेळी अशा गंभीर अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या परिसरामध्ये लक्ष देण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.
पंचवटी एक्स्प्रेसची कपलिंग कसारा येथे तुटली
दरम्यान, मनमाडहून मुंबईला निघालेल्या पंचवटी एक्स्प्रेसच्या डब्यांचे कपलिंग निघाल्याची घटना कसारा स्थानकात आज सकाळी घडली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळच्या सुमारास कसारा स्थानकात पंचवटी एक्स्प्रेसचे तीन आणि चार क्रमांकाचे डबे इंजिनपासून वेगळे झाले. त्यामुळे गाडी काही अंतरावर जाऊन थांबली. रेल्वे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ डबे जोडले.
इतर महत्वाच्या बातम्या