नाशिक : जिल्ह्यात पाणी टंचाईचे (Water Scarcity) संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. नाशिककरांची तहान भागावणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) केवळ 25 पाणीसाठा शिल्लक आहे. तर जिल्यातील अनेक धरणांनी तळ गाठला आहे. शहरातील काही भागात टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. ग्रामीण भागातही दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली आहे. 


मनमाडला (Manmad) महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करवा लागत आहे.  वाघदर्डी धरणात केवळ 20 ते 22 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा (Water Storage) शिल्लक आहे. तर पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनावरच मनमाडकरांच्या पाण्याची भिस्त अवलंबून आहे. तर पेठ (Peth) तालुक्यातही भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पाण्यासाठी नागरिकांना तब्बल दीड किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.


मनमाडला महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा


पाणीटंचाईचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाडकरांना याही वर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात केवळ 20 ते 22 दिवस पाणी पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे नगर परिषदेकडून महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या तीन दशकांपासून सव्वा लाख लोकवस्तीच्या मनमाड शहराला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण कोरडेठाक पडले आहे. आता पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनावरच मनमाडकरांच्या पाण्याची भिस्त अवलंबून आहे. आवर्तन मिळाले नाही तर मनमाडकरांना भीषण पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे. 


पेठ तालुक्यात भीषण पाणी टंचाई


नाशिकच्या पेठ तालुक्यातील वाड्या -वस्तीवरील महिलांना तब्बल दीड ते दोन किलोमीटर पायपीट करून केवळ दोन हंडे पाणी मिळते. हे पाणी आणण्यासाठी तास-दीडतास लागत असल्याचे वास्तव आहे. पेठ तालुक्यात जलजीवन योजनेच्या माध्यमातून 85 कामे सुरू आहेत. तर 77 कामे ही निर्धारित मुदत संपूनही पूर्ण करण्यास ठेकेदार अपयशी ठरले आहेत. त्यामुळे जलजिवन योजनेचे पाणी मुरते कुठे? असा सवाल ग्रामस्थ करू लागले आहे. मार्च 2024 पर्यंत ही योजना पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट होते. मात्र विहिरींना पाणी नाही, वीजपुरवठा कनेक्शन अपूर्ण आहेत. काही ठिकाणी आर्थिक बजेट वाढल्याने कामे अपूर्ण आहेत. ऐन पाणी टंचाईत या योजनेतील शुल्लक कारणांनी नागरिकांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत असल्याने महिला वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. 


आणखी वाचा 


Gangapur Dam : नाशिककरांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा खालवला, पाणी टंचाईचं संकट अधिक गडद