Nashik Water Scarcity : राज्यात मान्सून (Monsoon) दाखल झाला आहे. मात्र अजूनही नाशिकला मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. नाशिक जिल्ह्यातील काही भागात दोन दिवस पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली असली तरी मान्सून अजून सक्रीय झाल्याचे दिसत नाही. तर मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने नाशिक शहरासह जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई (Water Scarcity) निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सध्या 366 गावे आणि 941 वाड्या अशा एकूण 1 हजार 307 गाव-वाड्यांना 399 टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.
जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ११ जून अखेर केवळ 8.14 टक्के पाणीसाठा (Water Storage) शिल्लक आहे. मागील पावसाळ्यात बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती. मात्र, काही धरणाचा पाणीसाठा कमीच होता. गेल्या पावसाळ्यापेक्षा जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा 16 टक्के कमीच झाला होता. त्यात आता जून महिन्यात हा साठा 8.14 टक्के झाला आहे. नाशिककरांची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) सध्या 19.45 टक्के पाणीसाठी आहे. तर गंगापूर धरण समुहात एकूण 17.06 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील काही दिवसात मुसळधार स्वरुपात (Rain) पाऊस न कोसळल्यास पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होणार आहे. नाशिक जिल्ह्यात (Nashik News) सध्या स्थितीत 14 तालुक्यातील सात लाख 20 हजार 372 नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टँकर आणि अधिग्रहित केलेल्या विहिरींवर अवलंबून आहेत.
अशी आहे नाशिकची पाणी टंचाईची परिस्थिती
- मालेगाव तालुक्यात 44 गावे व 88 वाड्या (56 टँकर)
- सिन्नर तालुक्यात 16 गावे व 264 वाड्या (44 टँकर),
- बागलाण 34 गावे व 12 वाड्या (42 टँकर),
- येवला तालुक्यात 61 गावे व 60 वाड्या (60 टँकर),
- सुरगाणा 31 गावे व 11 वाड्या (42 टँकर),
- चांदवड 29 गावे व 97 वाड्या (33 टँकर),
- पेठ 18 गावे व 13 वाड्या (16 टँकर),
- त्र्यंबकेश्वर चार गावे (4 टँकर)
- कळवण तालुक्यातील १९ गावे व दोन वाड्या तर दिंडोरीतील पाच गावे पाणी टंचाईला तोंड देत आहे. त्यांच्यासाठी अनुक्रमे 22 व पाच विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
- निफाड हा असा एकमेव तालुका आहे जिथे संपूर्ण उन्हाळ्यात आजतागायत टँकरची गरज भासलेली नाही.
- खासगी व शासकीय अशा एकूण 399 टँकरद्वारे दैनंदिन ८८९ फेऱ्यांमधून पाणी पुरवठा केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या