Nashik Teachers Constituency Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दररोज नवा ट्विस्ट येत आहे. आजपासून निवडणुकीतून माघारीला सुरुवात झाली आहे.  नुकताच महायुतीचे शिवसेना शिवसेना गटाचे उमेदवार विद्यमान खासदार किशोर दराडे (Kishor Darade) यांचे नाम साधर्म्य असणारे किशोर दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या पाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गोपाळराव गुळवे (Sandeep Gulve) यांचे नाम साधर्म्य असणारे संदीप नामदेव गुळवे यांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. 


नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 38 उमेदवारांनी 53 नामनिर्देशन पत्रे दाखल केले होते. त्यापैकी 36 उमेदवारांचे अर्ज वैध व दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. आता माघारीला सुरुवात झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून नाम साधर्म्य असणाऱ्या उमेदवारांच्या माघारीसाठी प्रयत्न केले जात आहेत. निवडणुकीसाठी 26 जूनला मतदान होणार असून 1 जुलैला मतमोजणी होणार आहे.   


ठाकरे गटाचा गंभीर आरोप 


अपक्ष उमेदवार संदीप गुळवे या उमेदवाराने नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. मात्र प्रतिस्पर्धी उमेदवाराने संदीप गुळवे या उमेदवाराला राज्याबाहेर नेल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तावडीतून संदीप गुळवे यांना सोडवून आणल्याचा दावादेखील ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे. 


उमेदवारीवरून महायुती अन् महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच


दरम्यान, शिवसेना शिंदे गटाकडून किशोर दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाकडून धुळ्यातील महेंद्र भावसार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीतील दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीत समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने संदीप गुळवे यांना उमेदवारी जाहीर केली असताना काँग्रेसने दिलीप पाटील यांना उमेदवारी दिल्याने महाविकास आघाडीतदेखील फूट पडल्याचे दिसून येते. तर भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघात चांगलीच चुरस वाढल्याचे दिसून येत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


'आता शरद पवारांनीच मराठा आरक्षणाबाबत नेतृत्व करावं, नाहीतर...'; सकल मराठा समाजाचा थेट इशारा


नाशिक शिक्षक मतदारसंघ : 'टीडीएफ'चे भाऊसाहेब कचरे अधिकृत उमेदवार, फूट पडल्याच्या चर्चांना पूर्णविराम!