Nashik Rain Update : नाशिक शहरासह जिल्ह्याला रविवारी जोरदार पावसाने (Rain) झोडपले. एकीकडे उकाड्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. खरिपाच्या (Kharif Season 2024) पेरण्या सुरु होणार असल्याने बळीराजा (Farmers) सुखावला. तर दुसरीकडे वादळी वाऱ्याने काही ठिकाणी पत्रे उडाले. उमराणे, तिसगाव परिसरात जवळपास 25 कांदाशेड उद्ध्वस्त झाले. तसेच पावसामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला.  


मालेगावी वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी 


विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह, झाडांची पडझड व नागरिकांची तारांबळ उडवित नाशिकच्या मालेगाव (Malegaon) शहर व तालुका परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. पाऊस बरसल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या वादळी पावसामुळे मालेगाव परिसरातील काही वृक्ष उन्मळून पडले. गेल्यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे प्रतिक्षा करीत होते. आता ही प्रतीक्षा संपली असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


चांदवडला पावसाच्या हजेरीनंतर रस्त्यांना नदीचे स्वरुप 


चांदवड (Chandwad) शहरासह तालूक्यात मुसळधार पाऊस झाला असून चांदवड शहरातील सोमवार पेठ भागात रस्त्यांवरुन नदीच्या स्वरूपात पाणी वाहत होते. रस्त्यावरील जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्यावरील एक कार या पाण्याच्या प्रवाहात उलटी वाहत गेली. एकंदरीतच पहिल्याच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून लवकरच शेतीच्या पेरण्यांना सुरुवात होण्याची आशा शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. 


नांदगाव, मनमाडला पावसाची जोरदार बॅटिंग 


नाशिकच्या मनमाड (Manmad), नांदगाव (Nandgaon) शहर व परिसरात काल रात्री मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. मनमाड शहरात सुमारे तासभर सुरु असलेल्या या मुसळधार पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पावसामुळे मनमाड शहरातून वाहणाऱ्या रामगुळणा व पांझन नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी वाहिले. तर नांदगाव शहर व परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून शेतात पाणी साचले. यंदा वेळेत पाऊस पडल्याने खरीप हंगामाच्या पेरणी कामाला सुरवात होणार असल्याने बळीराजा सुखावला आहे. 


देवळा तालुक्यात दोघांचा मृत्यू


नाशिकच्या देवळा (Deola) तालुक्यातील उमराणे (Umrane) येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असताना कांद्याच्या शेडमध्ये निवाऱ्यासाठी थांबलेल्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोघे पिता पुत्र पावसामुळे या शेडमध्ये निवाऱ्यासाठी थांबलेले असताना शेड कोसळले त्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. देविदास भाऊराव अहिरे असे या मृत मुलाचे नाव आहे. तर दुसऱ्या घटनेत तिसगाव येथील इंदिरानगर परिसरात वीज कोसळल्याने एक बैल व आकाश देवरे नामक 20 वर्षीय तरुणाचा देखील मृत्यू झाला आहे. वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे उमराणे येथील दोघा शेतकऱ्यांच्या कांद्याचे शेड उडाले. यामुळे कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. 


वादळी वाऱ्याने 25 कांदाशेड उद्ध्वस्त, व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान


जिल्ह्यातील उमराणे, तिसगाव (Tisgaon) परिसरात झालेल्या वादळी वाऱ्याने येथील 20 ते 25 कांदा व्यापाऱ्यांचे मोठे लोखंडी शेड अक्षरशः कोसळून पडले. तर अर्धा किलोमीटरपर्यंत पत्रे लांबपर्यंत उडाले. यामुळे व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शिवाय साठवलेल्या कांद्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


आणखी वाचा 


Pune Rain Update: मान्सूनचा एन्ट्रीलाच धडाका, बदाबदा कोसळणाऱ्या पावसाने पुणेकरांना धडकी, 34 वर्षाचा रेकॉर्ड मोडला